Wednesday, September 9, 2026
Homeराजकीयबीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कुणी मारली बाजी?

बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कुणी मारली बाजी?

बीड । Beed

राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा अखेर धक्कादायक निकाल समोर आला आहे. गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या या हायव्होल्टेज लढतीत गावकऱ्यांनी प्रस्थापित सत्तेला मोठा धक्का दिला असून, स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या पराभवामुळे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना मोठा फटका बसला असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

- Advertisement -

ही पोटनिवडणूक प्रामुख्याने दोन विचारधारांमध्ये विभागली गेली होती. अश्विनी देशमुख यांनी आपल्या प्रचारात दिवंगत पती संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांकडे भावनिक साद घातली होती. ‘वारसा आणि न्याय’ या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली. तर दुसरीकडे, स्वरूपानंद देशमुख यांनी आपल्या वैयक्तिक कार्यकाळातील कामांचा पाढा वाचत आणि ‘गावचा विकास कोण करू शकतो’ या मुद्द्यावर जनतेचे मत मागितले होते. अखेर मतदारांनी भावनिक आवाहनाऐवजी कामाच्या जोरावर स्वरूपानंद यांच्या पारड्यात आपले दान टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख भावूक झाले होते. ते म्हणाले, “हा विजय माझा नसून माझ्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या तरुण पोरांचा आणि गावातील स्वाभिमानी जनतेचा आहे. मी पूर्वीही संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईत सामील होतो आणि यापुढेही त्यांच्या न्यायासाठी लढत राहीन. गावात रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन.”

मस्साजोगच्या गावकऱ्यांनी दिलेल्या या कौलामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर गावात गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. प्रस्थापितांच्या विरोधात गेलेला हा निकाल भविष्यातील स्थानिक राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. आता नवनिर्वाचित सरपंचांच्या नेतृत्वाखाली मस्साजोगचा विकास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मंत्री विखे पाटलांच्या राजीनाम्याची...

0
सातपूर | प्रतिनिधी | Nashik मराठा समाजाच्या (Maratha Community) प्रलंबित प्रश्नांवरून मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा आरक्षण...