राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहरी खुर्द येथील पिण्याच्या पाणी योजनेतून काही प्रतिष्ठीतांनी चक्क एक नव्हे तर चार बोगस कनेक्शन व तेही अर्धा इंची नसून जवळपास एक इंची जोडल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून संबंधित पाणी चोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर सह १४ गावे पिण्याची पाणी योजना राज्यात आदर्शवत ठरली होती. स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या नियोजनातून दिशादर्शक काम या योजनेमार्फत सुरू होते. योजनेकडे जवळपास दोन कोटी रुपयांच्या ठेवी स्वरूपात शिलकी होत्या. परंतु आज योजना बंद पडण्याच्या मार्गावर आलेली दिसत आहे. थकबाकीच्या कारणातून अनेक वेळा योजनेचा वीजपुरवठा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो व गावोगावच्या अनेक लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. या योजनेत राहूरी खुर्दचा समावेश असताना मोठ्या थकबाकीमुळे राहुरी खुर्दचा पाणीपुरवठा मध्यंतरी बंद करण्यात आला होता.
नगर-मनमाड रोडवरून सध्या बीएसएनएलची व इतर खोदकामे सुरू आहे. यावेळी मात्र धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक धन-दांडग्या पुढाऱ्यांकडून योजनेतून अर्धा इंची नव्हे तर एक एक इंचाचे चार चार कनेक्शन एकाच घरात सापडल्याचे उघड झाले आहे. नगर-मनमाड रोडवरील एका मोठ्या धनदांडग्या व्यापारी व पुढाऱ्याच्या घरात जवळपास चार कनेक्शन्स पाऊण इंची व एक इंची याप्रमाणे जात असल्याचे उघड झाले. याचप्रमाणे गावात अनेकांची बेकायदेशीर जोडण्या असल्याची माहिती मिळते.
सर्वसामान्य नागरिक वेळेवर पाणीपट्टी भरत असताना या चोरीच्या कनेक्शन वर ग्रामसेवक व पाणीपुरवठा समिती नेमकी काय कारवाई करणार? याची चर्चा परिसरात सुरू आहे. नियमानुसार २००२ ला ज्यावेळी योजना सुरू झाली त्या वेळेपासून दंडाची आकारणी व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. पाणीपट्टी भरण्यासाठी गावातील बचत गटांतील महिलांकडून सक्तीने दोन हजार रुपयांची वसुली करण्यात आली. मात्र भारत संचार निगमच्या रस्त्यावरील खोदकामामुळे उघड झालेल्या या बेकायदेशीर जोडण्याबाबत प्रशासन व ग्रामपंचायत नेमकी कोणती भूमिका घेणार? दंडात्मक व फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याची कारवाई करणार का? याबाबत राहुरी खुर्द येथील रहिवासी साशंक दिसत आहे.