Monday, July 22, 2024
Homeनगर6 लाखाहून अधिक भाविकांनी घेतले मतमाऊलीचे दर्शन

6 लाखाहून अधिक भाविकांनी घेतले मतमाऊलीचे दर्शन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा चर्चच्या मतमाऊली भक्तिस्थान येथे 74 वा मतमाऊली यात्रा महोत्सव सहा लाखाहून अधिक सर्वधर्मीय भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यात्रादिनी सकाळी हरेगाव चर्चचे प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ यांच्या हस्ते व संजय पंडित, विलास सोनवणे आदींसह धर्मगुरुंच्या उपस्थितीत मतमाऊलीच्या शिरावर चांदीचा मुकुट चढवून व पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

दोन वर्षापासून करोना प्रादुर्भाव असल्याने भाविकांना दर्शनासाठी येता आले नाही. आता प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सकाळपासून हरेगाव फाटा ते चर्चपर्यंत पदयात्रेने येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दुपारी 4 वा. नाशिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी पवित्र मरीयेच्या जन्माचा उद्देश, ध्येय या विषयवार तसेच मातेचा महिमा व जीवन यावर प्रवचन केले. यावेळी स्थानिक धर्मगुरू समवेत परिसरातील सर्व धर्मगुरू उपस्थित होते.

पावसाच्या पार्श्वभुमीवर येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता. रस्त्याने व चर्चपर्यंत विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स थाटली होती. श्रीरामपूर फोटोग्राफर्स संघटना, दीपक तोरणे आदींसह अनेक मित्रमंडळ व संस्थांकडून भाविकांना चहापाणी नाश्ता, जेवण, फराळ आदींची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, नगरपालिका, महावितरण, एसटी महामंडळ, उंदीरगाव व हरिगाव ग्रामपंचायत आदींनी यात्रेकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी आभार मानले.

सकाळी यात्रा शुभारंभप्रसंगी माजी आ. चंद्रशेखर कदम, साई संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेस नेते हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाऊलबुद्धे, रईस जहागीरदार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यात्रेची पाहणी केली.

यावेळी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वीज महावितरणचे दिवसभरात दोन ट्रान्सफॉर्मर जळाले असल्यामुळे दिवसभर यात्रेत वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन यात्रेच्या काळात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वीज नसल्यामुळे अनेकांची हाल झाले. तो काल संध्याकाळी 6 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. काल पोलीस व वीज वितरण विभागाच्या कामगिरीबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

यात्रेत सोरट जोमात

150 पोलिसांचा बंदोबस्त मिळूनही पोलिस प्रशासनाचे योग्य नियोजन न दिल्यामुळे भाविकांना छेडछाड व चेन स्नॅचिंग सारख्या प्रकारांना सामोरे जावे लागले. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष होते. एवढा मोठा बंदोबस्त असूनही अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू. रहाट पाळण्याच्या अपघातात एक यात्रेकरू गंभीर जखमी झाला, सबंधित पाळण्यावाल्यांनी परस्पर प्रकारण दाबले, तक्रार करूनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.

पोलिसांची मनमानी

हरेगाव मतमाऊलीची यात्रा म्हटली की, पोलिसांची उत्तम नियोजन चांगले राहत असे. मात्र यावर्षी एकदर पोलीस बंदोबस्त कमी आणि त्यात पोलिसांची यात्रेकरुंवर दमबाजी. हरेगावहून उंदिरगाव, गोवर्धन या गावांकडे जाणार्‍या नागरिकांनी एकच रस्ता असल्यामुळे त्यांना या रस्त्याशिवाय पर्याय नाही. तरी या भागात त्यांच्या घरी जाणार्‍या नागरिकांना पोलिसांनी हरेगाावच्या आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणीच अडवले. त्याना त्यांच्या घरी जाण्यापासून रोखून त्याचठिकाणी ताटकळत ठेवले. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप झाला. पोलिसांच्या या मनमानीचा फटका या भागातील नागरिकांना चांगलाच बसला.

शासकीय जागेत रहाटपाळणे महसूल कोणाकडे?

हरेगाव मतमाऊलीच्या यात्रेनिमित्त रहाटपाळणे शासकीय जागेत तहसीलदारांची परवानगी नसतानाही उतरवले गेले. त्यामुळे जागेचा जो महसूल गोळा करण्यात आला तो कोणाकडे हे कोणालाच माहिती नाही. महसूल घेताना कोणतीही पावती अथवा लेखी देण्यात आले नसल्यामुळे सदर कृत्य हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याचा महसूल कोणी गोळा केला याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब दरेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या