भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे आज पूर्ण झाली आहेत. अवघा देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाने भारला आहे. पंचाहत्तरावा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. एकशे तीस कोटींहून जास्त भारतीयांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबवून जनतेला या महोत्सवात सामावून घेतले जात आहे.
15 ऑगस्ट 1947 या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षांच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला, पण सहजासहजी नव्हे! अनेक आंदोलने झाली. हजारो स्वातंत्र्य सेनानींनी त्यासाठी संघर्ष केला. छातीवर गोळ्या झेलून प्राणांची आहुती दिली. जागतिक इतिहासात स्थान मिळवणार्या अनेक नेत्यांचे नेतृत्व स्वातंत्र्यलढ्याला लाभले. त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली. स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेली पीढी आता इतिहासजमा झाली आहे. पाऊण शतकाच्या या मोठ्या कालखंडात शेती, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिक, वैद्यकीय, विज्ञान, संशोधन, अंतराळ अशा अनेक भारताने क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. अनेक प्रगत आणि विकसित देशांचे डोळे भारताच्या प्रगतीने दिपले आहेत.
स्वतंत्र भारताने लोकशाही राजवट स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार देशाच्या लोकशाहीची समर्थ आणि समृद्ध वाटचाल सुरू आहे. त्याविरोधी प्रयत्न करणार्यांची योग्य प्रकारे नोंद घेऊन स्पष्टपणे व्यक्त होण्याइतके शहाणपण भारतीय जनतेत आता विकसित झाले आहे. विविध प्रांत, भाषा, जाती, धर्म, आचार, विचार, जीवनशैली, रुढी-परंपरा असलेल्या राज्यांचा मिळून एकसंघ भारत पाहावयास मिळत आहे. सर्व जण गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विविधतेत एकतेचा अंगीकार करणार्या भारताचे जगाला म्हणूनच कौतुक वाटते. तथापि काही विशिष्ट हेतूने त्या एकतेवर आघात करण्याचे प्रयत्नही अधूनमधून होत असतात, पण अद्याप तरी ते प्रयत्न देशाच्या एकतेला हानी पोहोचवू शकलेले नाहीत.
लोकसंख्येत जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असलेल्या भारताने आतापर्यंत केलेली चौफेर प्रगती नजरेत भरणारी आहे. अर्थात वाढत्या लोकसंख्याभाराचा परिणाम काही प्रमाणात देशाच्या प्रगतीवर झाला हे नाकारून चालणार नाही. तरीसुद्धा कुटुंबकल्याणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्या-त्या वेळच्या केंद्र सरकारांनी लोकप्रबोधनातून प्रयत्न केले. शिक्षणाचा प्रसार वाढत गेला; त्यासोबत लोकांना छोट्या कुटुंबाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे कुटुंबकल्याण कार्यक्रमाला गती प्राप्त होऊन लोकसंख्या नियंत्रणाला बळ मिळाले. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. तो देशासाठी महत्त्वपूर्ण ठरला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय लोकशाहीचा पाया भक्कम रचला. सीमांवर खडा पहारा देऊन भारतीय जवान देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करीत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची विभागणी करण्याचे ऐतिहासिक कार्य अनाठायी रक्तपात टाळून सफाईने पार करून जगाला अचंबित केले.
भारतीय शेतकर्यांनी कष्ट करून व आधुनिकतेची कास धरून शेतीत हरितक्रांती घडवली. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. अन्नधान्यासाठी भारत हा अनेक देशांसाठी आशास्थान बनला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यशाची अनेक उड्डाणे घेऊन अंतराळ क्षेत्रात जगभर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील भारताची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी जगावर करोना महामारीचे महासंकट ओढवले. त्यावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लस संशोधनात प्रमुख देशांमध्ये भारत अग्रेसर ठरला. अल्पावधीत स्वदेशी लसींची निर्मिती करून आणि लसीकरण मोहीम राबवून देशवासियांना सुरक्षाकवच देण्याची अभूतपूर्व कामगिरी भारत सरकारने केली.
अनेक लहान-मोठ्या देशांनासुद्धा लस उपलब्ध करून त्यांना करोनाशी झुंजण्याचे बळ दिले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे सांगणार्या प्रवृत्ती आणि त्यांचे समर्थन करणार्या भक्तांना अयोग्य प्रोत्साहन मिळत असले तरी जनतेवर त्या विचाराचा प्रभाव जाणवत नाही. नवा भारत घडवला जात असल्याची पोकळ फुशारकी काही नेते मारत आहेत. मात्र नवा भारत घडवताना हजारो वर्षांची परंपरा सांगणार्या भारताचा आत्मा त्यात हरवणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतात लोकशाही पुरेपूर रुजली आहे. तळागाळापर्यंत ती पोहोचली आहे. लोकशाहीतूनच प्रत्येकाची आणि देशाची प्रगती होऊ शकते यावर काही समाजघटक वगळता भारतीयांचा अढळ विश्वास आहे. म्हणूनच लोकशाही मार्गाने राज्याराज्यांत निवडणुका होऊन लोकांनी निवडून दिलेली सरकारे सत्तारूढ होतात. लोकांच्या हिताची कामे करतात. तथापि अलीकडील काळात लोकशाहीला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विरोधी पक्षांची सरकारे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून पाडली जात आहेत.
पुढील काळात देशातील प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील व केवळ आमचाच पक्ष अस्तित्वात राहील, अशी एका राष्ट्रीय पक्षाध्यक्षांची वल्गना लोकशाहीसाठी धोक्याची घंटाच म्हटली पाहिजे. प्रादेशिक किंवा इतर पक्ष नष्ट झाले तर लोकशाहीला ते आव्हान ठरेल व हुकूमशाहीला ते आमंत्रण ठरू शकते. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणार्यांपैकी काही बुजुर्ग मंडळी संख्येने कमी असली तरी आजही आपल्यात आहेत. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीचे ते साक्षीदार आहेत. स्वातंत्र्याची शतकाकडे वाटचाल करताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवून देशाचा कारभार करणार्यांमध्ये अजूनही अनुभवाची कमतरता जाणवते. उथळपणाला बळ दिले जाते. राज्यांना सोबत घेऊन व त्यांचे प्रश्न सोडवून संघराज्य पद्धती अधिक मजबूत करण्याची नितांत गरज आहे. मात्र त्याऐवजी उलट्या दिशेने प्रयत्न होत आहेत. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हालापेष्टा सोसल्या अशी सत्शील माणसे आजच्या राजकीय प्रवाहातून बाहेर फेकली जात आहेत.
सत्तापिपासूवृत्ती वाढत आहे. कालसापेक्ष बदल घडतच राहणार, पण ते बदल भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही व राज्यघटना यांना नख लावणारे नसावेत. एक बलवान राष्ट्र म्हणून भारत नावारूपास यावा, अशी अपेक्षा आपण सर्व भारतीय आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी ठेवूया आणि तसे प्रयत्न करूया! जयहिंद!