मुंबई | Mumbai
चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा (Chandrapur Municipal Corporation Election) निकाल लागूनही अद्याप महापौरपदाचा तिढा सुटलेला नाही. आपल्याच गटाचा महापौर बसावा, यासाठी काँग्रेस पक्षातील (Congress Party) वडेट्टीवार-धानोरकर यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींसमोर दिल्लीत जाऊन सत्तेच्या वाटाघाटी केल्या. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही पक्षातील वाद न सुटल्याचे दिसत आहे.अशातच आता चंद्रपुरात भारतीय जनता पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने (BJP) ठाकरे सेनेला (Shivsena UBT) महापौरपद सव्वा–सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते.तसेच पाच वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाचीही ऑफर भाजपने दिल्याचे बोलले जाते. यात पहिले सव्वा वर्षांचे महापौरपद आपल्याकडे असावे, असा आग्रह भाजपने धरल्याचे सांगितले जाते. जर हा फॉर्म्युला ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य नसेल तर भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवर बसण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी सत्तास्थापनेची आमची तयारी पूर्ण झाली असून, महापौर आमचाच होईल, असे म्हटले आहे. संगीता खांडेकर आमच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या नावाची उद्या दुपारपर्यंत घोषणा होईल. चंद्रपूर मनपात महापौरपद निवडून आणण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात असून, चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रपुरात (Chandrapur) काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकून आल्याने महापौरपदासाठी त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र वडेट्टीवार-धानोरकर यांच्या गटापैकी कुणाला काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याने दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर वाटाघाटी झाल्या. यात वडेट्टीवार आणि धानोरकर गटाने अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घ्यावे. तसेच सत्ता पक्षातील वाटेकर्यांना स्थायी समितीची जबाबदारी द्यावी, अशी चर्चा वरिष्ठांसोबत झाल्याचे सांगितले जाते. या वाटाघाटीत ठाकरे सेनेला महत्त्व न दिल्याने ते नाराज असल्याचे समजते.
ठाकरेंची सेना काय भूमिका घेणार?
ठाकरे सेनेला (Shivsena UBT) भाजप आणि काँग्रेसकडून महापौरपदाची ऑफर मिळाल्याने ते ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहेत. भाजपसोबत हातमिळवणी केल्यास चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, तर काँग्रेससोबत गेल्यास सत्तेचे गणित वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कोणासोबत हात मिळवणी करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
चंद्रपुरातील पक्षीय बलाबल
एकूण नगरसेवकांच्या जागा – ६६
काँग्रेस २७, भाजप २३, शिवसेना (उबाठा) ०६, वंचित ०२, बसपा ०१, शिवसेना (शिंदे) ०१, अपक्ष ०२, एमआयएम ०१, काँग्रेस समर्थित जनविकास सेना ०३





