मागील शब्दगंध पुरवणीत संकल्पाबाबत लिहीले होते. जन्मापासून तर अंतिम श्वासापर्यंत व्यक्ती कोणता ना कोणता संकल्प करत असतो. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. या संकल्पात एक महत्वपूर्ण संकल्प असतो तो अर्थार्जनाचा. अर्थ शब्द लहान असला तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. तसाच त्याच्या अर्थाचा अर्थ ही व्यक्तीपरत्वे आणि भौगोलिक स्थितीनुसार वेगवेगळा असतो. भाषा, अर्थशास्त्र, भुगोल, राजकारण आणि समाज यासारख्या विविध प्रांगणात ‘अर्थ’ शब्द नेला तर काय काय गंमती होतात किंवा होत आहेत ते वाचाच…
आपण सारे भारतीय तसे आरंभशुरच. नविन काही आले की ते आपल्याला आकर्षित करत असते. ते नविन आपल्याला कसे प्राप्त करता येईल, आपल्या ताब्यात कसे राहील याचा प्रयत्न आपण सारेच करत असतो. ‘नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे आपण वागत असतो. याबाबत दुमत असेल असे मला तरी वाटत नाही. कारण नववर्ष असो वा सणवार आपण नविन संकल्प किंवा कोणत्यातरी कामाचा शुभारंभ करत असतो. नविन असल्याने आपण त्याकडे वेळात वेळ काढून लक्ष देत असतो. नववर्ष आले की मी वर्षभर अमुक अमुक करण्याचा संकल्प / मनोदय करत असतो. पण हा मनोदय, संकल्पाची कार्यवाही काही दिवसापूरती काटेकोरपणे केली जाते आणि नंतर ‘येरे माझ्या मागल्या’. या संकल्पातील एक संकल्प मात्र काटेकोरपणे पाणला जातो. तो म्हणजे ‘अर्थाजना’चा. ‘अर्थ’ हा शब्द छोटा वाटत असला तरी त्यात खूप सारे ‘अर्थ’ सामावलेले आहेत. ‘अर्थ’ हा शब्द आपण विविध क्षेत्रांच्या प्रंगणात नेऊन पाहू. काय काय बाहेर येते ते पाहू.
‘भाषे’च्या प्रांगणातून ‘अर्था’ चा ‘अर्थ’.
भाषेच्या प्रांगणात अर्थ या शब्दाला नेले असता मराठीत आपल्या मनातील विचार, भावना या समोरच्याला जसेच्या तसे समजून त्यानुसार त्याच्याकडून कृती/कार्यवाही होणे म्हणजे त्याला आपल्या विचारांचा, भावनांचा ‘अर्थ ’ समजला असे म्हणता येईल. आपल्याला जे सांगावयाचे आहे, जे सांगून त्यांच्याकडून त्यानुसार आपल्याला अपेक्षित आणि आनंद देणारी कृती घडली की मनांच्या तारा जुळतात. आणि आपल्या मनात त्याच्याबाबत एक गुडविल अर्थात चांगली प्रतिमा तयार होते. आपण त्याला कोणतीही मदत/ सहकार्य करण्यास आनंदाने आणि मनापासून तयार होतो. आपणही समोरच्याच्या विचारांशी, भावनांशी जोडले जात त्याचे आनंद व समाधान होईल अशी कृती, विचार किंवा भावनांशी बांधले जातो.अनेकजण बोलण्याच्या ओघात बोलत असतात. किंवा आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी अचकटविचकटपणे वाद निर्माण होईल असे बोलत असतात. त्यांच्या या बोलण्याचा किंवा वक्तव्याचा समाजमनावर कधी चांगला तर कधी वाईट परिणाम होत असल्याचे दिसते. अशा वाचाळविरांचा काही घटकांकडून निषेध करण्यासह त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले जाते.पेशवेकाळात ‘ध’ चा ‘म’ करण्यात आला होता. धरावे असे आदेश असतांना ‘ध’ खोडून तेथे ‘मा’ रावे असे करण्यात आले होते. यामुळे झालेली हत्याही स्मरणात आहे. अनेक लोकप्रतिनिधी बोलून जातात. आणि जेव्हा त्यावरून वाद उपस्थित होत समाजात विरोधी वातावरण तयार होते तेव्हा ते मात्र माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे सांगून नामानिराळे होत असल्याचेही आपण वाचत आणि पाहतही असतो.
भुगोलाच्या प्रांगणातून ‘अर्थ’
वाचकहो, भुगोलाच्या प्रातांत ‘अर्थ’ हा शब्द नेला असता अर्थ (इंग्रजी शब्दानुसार) म्हणजे पृथ्वी असा होतो. पृथ्वीचा गोल शुन्यासारखा. या शुन्य गोलावर सार्या जगाचा अधिवास. या अधिवासाला नैसर्गिकरित्या धोका किंवा धक्का पोहचतो तेव्हा अर्थक्विक (एरीींर्र्हिींरज्ञश) अर्थात भूकंप होतो आणि या गोल पृथ्वीवरील समस्त जीवन उध्दवस्थ होत असते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सर्व काही उध्वस्त झालेले दिसते.
अर्थशास्त्राच्या प्रांगणात ‘अर्थ ’
अर्थशास्त्राच्या प्रांगणात ‘अर्थ ’ शब्द नेला तर त्याचा ‘अर्थ’ पैसे (चेपू) असा होतो. ज्याच्याकडे जेवढे जास्त पैसे तेवढा समाजात त्याला ‘मान’ असतो. या ‘अर्था’साठी घराघरापासून तर गल्लीबोळात आणि गल्लीबोळापासून तर दिल्लीतील तख्तापर्यंत रोज होत असलेले वादविवाद पाहत असतो. वाचत असतो.
अध्यात्मातून पाहीले तर ‘अर्थ’ (पैंसे) म्हणजे कागदावर छापलेले आकडे, किंवा धातूवर कोरलेले आकडे. असे म्हणता येईल. कारण जीवन हे नश्वर आहे. तुम्ही कितीही पैसा कमवला, संपत्ती जमवली तरी जीवंत असेपर्यंतच तीचा आपल्याला उपयोग. मृत्यूनंतर मात्र आपला इतरांसाठी आणि आपणच कमविलेल्या संपत्तीचा किंवा अर्थाचा आपल्याला उपयोग शुन्य असतो. म्हणूनच संत महात्मे सांगत असतात अशा माया मोहापासून दूर रहा. आवश्यकतेपेक्षा जास्त जमवू नको त्याचा काहीच अर्थ (उपयोग) होणार नाही. असे असले तरी पण या ‘अर्था’वरच मानव नावाच्या सजीवाचे जीवन अवलंबून आहे. कळायला लागल्यापासून मानव या ‘अर्थाजणासाठी’ धडपड करत असतो. मानव सोडला तर उर्वरीत कोणत्याही सजीवाचे या ‘अर्था’वाचून काहीच अडत नाही. देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत व्हावे म्हणून ‘अर्था’ ची निर्मिती आहे. नोट आणि नाणी अशा स्वरूपात या अर्थाने आर्थिक व्यवहार होत असतात. खरेदी विक्रीचे व्यवहार या अर्थानेच होत असतात. पैशाने अन्नासह जगण्यास आवश्यक असणार्या वस्तू खरेदी करता येतात. मात्र तो खाण्याचा पदार्थ नसला तरी अमक्याने पैसा खाल्ला असेही उपरोधीकपणे प्रचलीत वाक्य रोजच वाचत, ऐकत असतो. पैसे देवून काम करून घेणे, कामाचा मोबदला म्हणून पैसे कमविणे हा सरळमार्गी व्यवहार.
मात्र पैशांसाठी काम अडवणे, त्यात चुका, अपूर्णता काढणे किंवा चालढकल करणे हे चुकीचे असले तरी ते सध्या तरी शासकीय अलिखीत परिभाषेत शिष्टाचार मानला जात आहे. त्याला कायद्याच्या भाषेत ‘लाच’ म्हटले जाते. अशी ‘लाच’ मागणे, ती स्विकारण्यात शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी यांना ‘लाज’ वाटत नाही. अशा या ‘लाचे’ विरोधात कारवाई करण्यासाठी लाच लूचपत प्रतिबंध नावाचा खास शासकीय विभागही कार्यरत आहे. लाच लूचपत प्रतिबंध विभाग रोज कोठेना कोठे ‘रंगेहात’ कारवाई करत असला तरी ‘लाचे’ची ‘लाज’ न वाटणारे ‘लाचखोर’.
असे ‘अर्थाजन’ हे त्यांचे कर्तव्य नी अधिकार असल्यासारखे वागत असतात. अशा ‘लाचखोरा’ंची नावे, छायाचित्रे माध्यमातून प्रसिध्द होऊनही त्यांना त्याची ‘लाज’ वाटत नाही. रंगेहात पकडले जावूनही कायद्यातील पळवाटांतून हे लाचखोर पळून पुन्हा आहे त्या पदावर ताठ मानेने पुन्हा नवी ‘लाच’ मागण्याचे काम करत असतात. न्यायालयात याबाबत दाखल झालेली याचिका तो कर्मचारी निवृत्त होईपर्यंत चालूच राहते. लाचखोर निवृत्त झाल्यानंतर या याचिका रद्दबातल होत असतात. काही प्रकरणात लाचखोरांना शिक्षा होत असली तरी त्यातून ना ते स्वत: धडा घेत ना दुसरे सरकारी कर्मचारी.
‘ शेतीतला अर्थ’
‘अर्था’जणासाठी अनेक लोक रक्ताच पाणी करत असतात. त्यातील एक म्हणजे शेतकरी राजा आणि दुसरे कष्टकरी कामगार. शेतकरी शेतात घाम आणि रक्ताच पाणी करून धान्य पिकवतो. जोवर धान्य शेतात असते तोवर त्या धान्याला खूप भाव असतो. आणि जेव्हा शेतकरी हे तयार धान्य बाजारात विकण्यास आणतो तेव्हा मात्र भाव उतरलेले असतात. येथे शेतकर्याच्या शेतीचे ‘अर्थ’कारण बिघडते. मात्र व्यापार्यांचे ‘अर्थ’ कारण वाढलेले असते. शेतकरी आणि शेती यावर गल्लीपासून तर दिल्लीतील राजसत्तेत फार मोठी खलबते होत असतात. शेती आणि शेतकरी जगावा, जगाचा पोशिंदा जगावा यासाठी कोटींची उड्डाणे उडत असली तरीही शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयश आलेले आहे. असे असले तरी शेतीला व शेत मालाला सुगीचे दिवस आलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतीचे मोठे नुकसान होते, शासन स्तरावर पंचनामे होतात, पिक विमा कंपन्यांचे पंचनामे होतात. लाखो रूपयांची मदत जाहिर होत असली तरी ती अपवाद वगळता त्या शेतकर्यापर्यंत पोचतच नाही. आणि बळी राजाच्या नावावर ‘अर्थ’ कोठे जातो ते कळतच नाही.
राजकारणाच्या प्रांगणात ‘अर्थ’
राजकारणाच्या प्रांगणात ‘अर्थ’ नेला तर….साधा कार्यकर्ता असेपर्यंत त्याच्याकडे भाऊ तीस चाळीस रूपयांचे पेट्रोल टाक भो दुचाकीत अशी उदाहरणे पाहत असतो. मात्र तो जेव्हा लोकप्रतिनिधी होतो तेव्हा तर तीस चाळीस हजाराचे पेट्रोल भर या सर्व वाहनात असे आदेशही तो त्याच्या कार्यकर्त्यांना देत असल्याचे आपण पाहत असू किंवा अनुभवत असू. तीस चाळीस रूपयांपासून झालेली ‘अर्था’ ची सुरूवात अल्प काळातच तीस चाळीस हजारापर्यंत कशी पोहचते हे सर्वश्रूत आहे.
अर्थ संकल्पातील ‘अर्थ’
फेब्रुवारी महिना तसा सरकारच्या दृष्टीने ‘अर्थ’ संकल्पाचा. खूप खोलवर अभ्यास करून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर होण्यासाठी या ‘अर्थ’ संकल्पात तरतूदी केल्या जातात. सत्ताधारी त्याचे तोंडभरून तर विरोधक तोंड फिरूवून त्याचे स्वागत करत असतात. अशा या सरकारी ‘अर्थ’ संकल्पात सर्व सामान्य जनतेच्या ‘आर्थिक’उन्नतीसाठी केलेल्या तरतूदीमुळे सर्व सामान्य जनतेचे ‘अर्थ’ कारण सुधारल्याचे आजपावेतो ऐकिवात नाही. उलट गृहिंणीपासून तर सर्व सर्वसामान्यांचे ‘अर्थ’ कारण बिघडल्याच्या प्रतिक्रियाही माध्यमातून वाचत असतो. ‘अर्थ’ संकल्पातील तरतूदी केवळ काही ठराविक लोकांच्या ‘अर्थ’ कारणात सुधारणा होत असल्याचेही आपण वाचत असतो.
असे असले तरी या ‘अर्थ’ संकल्पातही छूपे ‘अर्थ’कारण असते. की जे थेट अंमलबाजवणीत येत असते. उदाहरण द्यायचे झाले तर गॅस दरवाढीचे घेता येईल. गॅसचे दर कमी करायचे आणि पेट्रोल डिजेलचे दर वाढवायचे. पुर्वी एलआयसीसह दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लागत नव्हते. आता या सर्वांवर जीएसटी कर लागलेला आहे. पुर्वी बँकांच्या एटीएम कार्ड आणि एसएमएस सेवेवर कर नव्हते. आता त्यावरही सेवाशुल्क लावले आहे. फोन रिचार्ज करतांना आता टॉकटाईम आणि व्हॅलेंडीटी असे वेगवेगळे पैसे द्यावे लागतात. कि जे आतापर्यंत नव्हते. या दोघांची मुदतही 45 दिवसांवरून 22 दिवसांवर आलेली आहे.
जीवनावश्यक वस्तूंवर कर वाढवत असतांना दारू, तंबाखुजन्य पदार्थावरील अबकारी शुल्क कमी केले जात आहेत. महागडी दारू स्वस्त झाल्याने दारू उत्पादक आणि विक्रेते यांच्या कमाईचे ‘अर्थ’ कारण वाढत असले तरी पिणार्यांचे ‘अर्थ’ कारण आणि ‘जीवन’ही संपलेले आपण रोज वाचत आणि पाहत असतो. अर्थशास्त्रात ‘अर्थ’ अनर्थ करत असतो. रोज कोठेना कोठे भ्रष्टाचार,लाच,घोटाळा यांच्या बातम्या वाचतच असतो.
एकूणच काय तर ‘अर्थ’ हा शब्द भाषा, भूगोल, राजकीय, अर्थशास्त्र यांच्या प्रांगणात नेला असता त्याचे ‘अर्थ’ ही बदलत असतात. व्यक्ती, स्थान आणि काळ परत्वे ‘अर्थ’ शब्दाचा ‘अर्थ’बदलून त्याचा सामान्य जनतेसोबतच सरकार आणि राजकारणावरही चांगला वाईट असा परिणाम होत असतो. यात दूमत असेल असे वाटत नाही. असो.
डॉ. पंकज पाटील