ठाणे | Thane
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर आज मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. पूर्णेकर यांची हत्या ही दुर्दैवी असून आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, असे सांगतानाच या प्रकरणात स्वतःचा काहीही संबंध नसल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात येत आहे
पत्रकार परिषदेत बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसताना मला केवळ राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात येत आहे. इथे टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सहानुभूती मिळवून आपला पक्ष वाचवण्यासाठी ठाण्यात आले होते. मी शिंदे गटात आहे आणि एक महिला आहे, म्हणूनच मला मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. माझे नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. पूर्णेकर यांचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी माझ्याविरोधात एफआयआरमध्ये नोंदवण्यासाठी मृतदेहाची विटंबना केली. कोणताही पुरावा नसताना माझ्यावर बेछूट आरोप करतायत. असं घाणेरडं राजकारण मी माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये बघितलेलं नाही. एका महिलेला गोवण्यासाठी हे सर्व चाललं आहे, शिंदे गटातले कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांना अडकवण्यासाठी धडपड चालू आहे असं शिंदे म्हणाल्या.
आदित्य ठाकरेला अटक झाली पाहिजे
तर दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे म्हणाल्याल की, दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सहा वर्ष पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. त्या एफआयआरमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंच नाव आहे. मला संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, ती पण कोणाची तरी मुलगी होती. अशावेळी तुम्ही आदित्य ठाकरेला अटक करा अशी मागणी केली का? असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी विचारला. एफआयआरमध्ये माझं नाव टाकून मला अटक करा अशी मागणी करताय. त्याआधी या प्रकरणाचा उलगडा केला पाहिजे. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेला अटक झाली पाहिजे अशी मागणी मिनाक्षी शिंदे यांनी केली.
ऑडिओ क्लिपशी काही संबंध नाही
मिनाक्षी ठाकरे यांनी आरोप केला की, ‘ऐवढेच आहे की शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना कुठेतरी अडकवण्याच्या प्रयत्न ते करत आहेत. या प्रकरणात कोणी दोषी असतील तर कारवाई करा. रागाला धरून जर कुणी कारवाई करत असेल तर ते चुकीचे आहे. ठोस पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप केले जात आहे. माझी आणि माझ्या पतीची चौकशी होणार आहे आणि त्याला मी सामोरे जाईन. ठाकरे आणि संजय राऊत राजकीय पोळी भाजत आहेत. ज्या ऑडिओ क्लिपबद्दल तुम्ही बोलत आहात ती एआय जनरेटेड आहे. त्या ऑडिओ क्लिपचा आणि पूर्णेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्याबाबत मी तक्रार केली होती. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि आम्ही सहकार्य करणार आहोत. पोलिस प्रसासन योग्य कारवाई करत आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी माझे नाव पुरवणी एफआयआरमध्ये जबरदस्ती टाकायला लावले.’
विमान हायजॅक झाले तर मीनाक्षी शिंदेंनीच केले म्हणतील
आपल्यावरील आरोपांचा उपरोधात्मक समाचार घेताना त्या म्हणाल्या, “इथे कोणीही उठून कसलेही आरोप करत आहे. उद्या जर एखादे विमान हायजॅक झाले, तर तेसुद्धा मीनाक्षी शिंदे यांनीच केले, असे हे लोक म्हणतील. पूर्णेकर यांचा मुलगा लहान आहे आणि ठाकरे गटाकडून त्याच्या तोंडातून हे सगळे बोलवून घेतले जात आहे. असा घाणेरडा कारभार मी कधीच पाहिला नव्हता.”
पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य करणार
मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले की, मी याच प्रभागात लहानाची मोठी झाली आहे. इथल्या प्रत्येक नागरिकासोबत संबंध येतो. अनेकजण फोटो काढतात. त्यामुळे फक्त फोटोवरून माझ्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, तुम्ही त्यांचे (प्रदीप पूर्णेकर) सोशल मीडिया अकाउंट तपासा. त्यावरून तुम्हाला समजेल की त्यांनी कोणासोबत वाद निर्माण करून घेतले आहेत, कोणाशी शत्रुत्व करून घेतले हे लक्षात येईल असे म्हटले. आपण पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असून योग्य वेळी अधिक भाष्य करू असे त्यांनी म्हटले.




