– रूप नारायण दास, माजी संयुक्त सचिव लोकसभा सचिवालय
जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रसंग स्वातंत्र्योत्तर भारताच्या लोकशाहीतील आणि राजकीय प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. संसद भवन ही केवळ वीट आणि वाळूंनी उभारलेली इमारत नाही तर देशाची समृद्ध संसदीय परंपरा पुढे नेणारी आणि तिचे आधार बळकट करणारी वास्तू आहे, हे विसरता येणार नाही.
प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरीत करताना माझ्या मनात भावनांची गर्दी झाली आहे. सुमारे तीन दशके या संसदेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आणि या भवनातील चढउतार अगदी जवळून पाहिल्याने आठवणी जाग्या झाल्या आहेत. या ठिकाणी मी ठरवून आलो नाही तर योगायोगाने संसद भवनात सेवा करण्याची संधी मिळाली. 1985 मध्ये दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्रात एम.ए केल्यानंतर एम.फिल आणि पी.एच.डीसाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला. एकेदिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी संसद भवनासमोरून जात होतो. मला भूक लागली होती. संसद भवनात कमी दरात भोजन मिळते, हे मला ठाऊक होते. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, या ठिकाणच्या स्वागत कक्षात कमी पैशात चांगले जेवण घ्यायचे का? मी इमारतीच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथील बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षा कर्मचार्याने हटकले आणि इमारतीत येण्याचे कारण विचारले. तेव्हा मी म्हणाले की, मला लोकसभा सचिवायलयातील संशोधक सहाय्यकाच्या पदासाठी अर्ज हवा आहे आणि त्यास मी पात्र आहे. अशारीतीने मी सप्टेंबर 1985 मध्ये सचिवालयात रुजू झालो आणि त्यावेळी मला रुजू होण्यासाठी तत्कालीन लोकसेभेचे मुख्य सचिव डॉ. सुभाष कश्यप यांना भेटण्यास सांगितले. यासंदर्भात ते एका अधिकार्याशी बोललेदेखील होते. माझी नियुक्ती सचिवालयाच्या संशोधन आणि माहिती विभागात करण्यात आली. माझ्यावर लोकसभेच्या अध्यक्षांसह अन्य मान्यवरांना प्रासंगिक कार्यक्रमासाठी भाषणाचा मसुदा लिहून देण्याची जबाबदारी सोपवली. जसे संसदेअंतर्गत असणारा संघ, राष्ट्रकुल संसदीय संघटना यांचे कार्यक्रम आणि संसदेला सदिच्छा भेट देणार्या शिष्टमंडळासमोर बोलणे. 1960 च्या दशकात संसद भवन परिसरात एखादा सार्वजनिक रस्ता असेल असा कोणी विचारही करू शकणार नाही. अर्थात, दिल्लीच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूपच कमी होती. मारुती मोटार आलेली नव्हती. राजधानीच्या रस्त्यावर एकमेव धावणारी मोटार म्हणजे अॅम्बेसिडर आणि फियाट. खासदार त्यांच्या निवासस्थानातून दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसने संसद भवनात पोहोचत. डीटीसीने संसद भवनात आताच्या जुन्या स्वागत कक्षाच्या कार्यालयाजवळ काऊंटर सुरू केले होते. संसद भवनात सहजपणे प्रवेश करता येत असे, त्याचबरोबर खासदारही भेटत असत. मला आठवते की, एकदा प्राध्यापक मधू दंडवते यांच्याशी मी एका कामानिमित्त संपर्क साधला. तेव्हा त्यांनी नुकतेच रेल्वेचे मंत्रिपद सोडले होते. पण संसद भवनाच्या संकुलात असलेल्या रेल्वे बुकिंग काऊंटरवर तिकीट आरक्षित करण्यासाठीच्या मागणीपत्रावर त्यांची सही हवी होती. प्राध्यापक दंडवते यांनी लगेच स्वाक्षरी केली. दंडवते यांच्यासारख्या लोकप्रिय आणि नामांकित व्यक्तींमध्ये असलेली नम्रता आजघडीला पाहावयास मिळणे दुर्मिळ आहे. संसद भवनातील आणखी एक ऐतिहासिक संस्था म्हणजे ग्रंथालय. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, के.आर. नारायणन, प्रोफेसर मधू दंडवते, प्रोफेसर एम.एल.सोधी यांसारखे अनुभवी खासदार नियमित ग्रंथालयात येत असत. वाचनकक्षात या मंडळींसाठी टेबल राखीव ठेवलेले असायचे. ग्रंथालयातील पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे खासदार मंडळी काळजीपूर्वक वाचन करत असत आणि सभागृहात चर्चेत बोलण्यासाठी नोटस् तयार करत असत. ग्रंथालयात नव्याने दाखल होणार्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले जायचे. त्यावर वाजपेयी यांचे लक्ष असायचे. अनेक नामांकित खासदार आठवड्यासाठीच असलेल्या प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नाव नोंदवायचे आणि ते प्रदर्शन संपण्याच्या कालावधीत परत आणून द्यायचे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नेहमीच ग्रंथालयात येत असत. ग्रंथालयात प्रादेशिक वर्तमानपत्र आणि देशातील विविध राज्यांतील राजधानीत प्रकाशित होणार्या इंग्रजी वर्तमानपत्रांचादेखील ग्रंथालयात समावेश होता. नव्या संसद भवनात एक गोष्ट दिसणार नाही, म्हणजे सेंट्रल हॉलची भव्यदिव्यता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र होत असताना ऐतिहासिक भाषण केले होते. देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर लोकसभा अस्तित्वात येताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात, नवीन संसद भवन हे राज्यसभा आणि लोकसभेच्या अशा दोन्ही सभागृहातील सदस्यांना सामावून घेण्यास सक्षम आहे. मात्र देश-विदेशातील अध्यक्ष, राष्ट्रप्रमुख यांच्या संसदेला संबोधन करण्याच्या परंपरेचे काय होणार? अशा ऐतिहासिक क्षणी आपण केवळ एकच इच्छा बाळगू शकतो की, ज्या संस्था केवळ विटा, मातींनी उभारलेल्या नाहीत पण समृद्ध संसदीय परंपरांनी साकारलेल्या आहेत आणि काळानुरूप त्या टिकून राहिल्या आहेत, अशा संस्था आणखी मजबूत व्हायला हव्यात.