अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
व्यापार्याच्या अंगावर मिरची पूड टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्या टोळीविरूध्द ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे. या टोळीत आठ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये टोळी प्रमुख विनोद बबन बर्डे (वय 27, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), टोळी सदस्य राहुल दिलीप येवले (वय 22, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), शुभम शहादेव धायतडक (वय 22, रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी), संदीप बबन बर्डे (वय 37, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), बाळासाहेब दगडु बडे (वय 23, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी), अमोल सुभाष मंजुळे (वय 24, रा. वडगाव तनपुरा, ता. कर्जत), भारत येलप्पा फुलमाळी (रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), हनु उर्फ हनुमंत गोल्हार (रा. पाथर्डी, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून अमोल मंजुळे, भारत फुलमाळी व हनु उर्फ हनुमंत गोल्हार पसार आहेत.
18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर दोन अज्ञात इसमांनी एका व्यापार्याला लुटण्याचा प्रयत्न केला. रामराजे प्रफुल्ल नेटके (रा. भांडेवाडी, ता. कर्जत) असे त्या व्यापार्याचे नाव आहे. ही घटना घडली, तेव्हा फिर्यादी आपल्या पैशाची बॅग घेऊन जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांच्या अंगावर मिरची पूड फेकली व मारहाण करून बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीच्या आरडाओरडीनंतर बाजार समिती परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. संशयित आरोपी पळून जात असताना त्यांच्यापैकी एकाच्या कंबरेतील पिस्तूल खाली पडले, जे नंतर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व संशयित आरोपींवर यापूर्वी दरोडा, घरफोडी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी मारहाण, खून, अपहरण, अत्याचार आणि अनुसूचित जाती-जमातीविरूध्द अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे ‘मोका’ अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आठही सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोका’ कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यास मान्यता दिली आहे.