अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
परजिल्ह्यातीत व्यापार्यांनी नगर तालुक्यातील दोन शेतकर्यांची तूर व कांदा खरेदी विक्री व्यवहारात सुमारे सव्वा दहा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (17 डिसेंबर) दुपारी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. महेश अर्जुन पालवे (वय 30 रा. मेहकरी, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यापारी संजय शिवलिंग स्वामी (रा. बाभळगाव, ता. जि. लातूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश यांनी त्यांच्या शेतात तूर लावली होती. दरम्यान, त्यांच्याकडे एका व्यापार्याने मोठ्या प्रमाणावर तुरीची मागणी केली. त्यामुळे महेश यांनी त्यांच्या शेतातील तुरीबरोबर व्यापारी संजय स्वामी याच्याशी संपर्क साधून तूर खरेदी करण्याचे ठरविले.
व्यापारी स्वामीने महेशला तूर पुरवठा करण्याचे आश्वासन देत पैशांची मागणी केली. त्यानुसार महेश यांनी त्यास चेक, आरटीजीएस, फोन पे व्दारे आठ लाख 10 हजार रुपये पाठविले. त्यानंतर व्यापारी स्वामीला महेश यांनी वारंवार संपर्क साधूनही त्याने तूर पुरवठा केला नाही. बरेच दिवस पाठपुरावा करूनही तूर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महेशच्या लक्ष्यात आले. त्यांनी मंगळवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दुसरी फिर्याद शेतकरी गोपाळ किसन मोरे (वय 50, रा. आठवड, ता. नगर) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश उर्फ दशरथ महादेव गुंजाळ (रा. आठवड) व व्यापारी सागर उत्तम शिंदे (रा. आंबेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ यांनी त्यांच्या शेतात कांदा लागवड केली होती. कांदा काढणी झाल्यावर त्यांच्या गावातील गणेशने त्यांना व्यापारी सागरचे नाव सांगून सदर व्यापारी तुमच्या बांधावर येवून चांगल्या भावात कांदा खरेदी करून घेवून जाईल असे सांगितले. गणेश हा गावातील असल्याने गोपाळ यांचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यांनी व्यापारी सागर याला दोन लाख 29 हजार 171 रुपये किंमतीचा 424 गोण्या कांदा दिला. त्यानंतर पैशांची मागणी केली असता व्यापारी सागरने उडवाउडवीची उत्तरे दिली. अनेकदा पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गोपाळच्या लक्ष्यात आले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.