नाशिक । प्रतिनिधी Nashik
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत मेरी मिट्टी, मेरा देश हे अभियान नाशिक जिल्ह्यात 9 ते 20 ऑगस्ट़ या कालावधीत राबवले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर व तालुका स्तरावर कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिलाफलक उभारणे, स्वातंत्र्यसैनिक, विरांना वंदन, पंचप्राण शपथ घेणे, ध्वजाराहणे कार्यक्रम, माती कलशामध्ये गोळा करणे, प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव टाकून हा मातीचा कलश प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करण्यात येणार आहे.
यासोबत वसुधा वंदनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या अमृत सरोवराचे ठिकाणी अथवा अमृत सरोवराचे परिसरात आयोजित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर अमृत सरोवर उपलब्ध नसल्यास इतर पाणी साठ्यांचे ठिकाणी, ग्रामपंचायत किंवा शाळा परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वसुधावंदन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
जिल्ह्यातल्या 1388 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 104100 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सदर वसुधावंदन उपक्रमामध्ये वृक्षलागवड करावयाची असल्याने वृक्षलागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर अमृत वाटिका तयार होणार, वसुधावंदन उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड होणार आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, अशासकीय संस्थाच्या रोप वाटीका, कृषी विभागाच्या रोप वाटीका यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
9 व 10 ऑगस्ट रोजी अमृत सरोवर किंवा गावात उपलब्ध जलाशयाच्या ठिकाणी 75 देशी प्रजातींच्या रोपांची वृक्षारोपण करणे. 11 रोजी आरोग्य केंद्र यांचे समन्वयाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले जाणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.