Friday, July 24, 2026
Homeक्राईमRahuri : म्हैसगाव परिसरात दारू व गांजाची खुलेआम विक्री

Rahuri : म्हैसगाव परिसरात दारू व गांजाची खुलेआम विक्री

म्हैसगाव |वार्ताहर| Mhaisgaon

राहुरी तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागातील म्हैसगाव येथे भरविण्यात येणार्‍या आठवडे बाजारात अवैध गांजा, गावठी तसेच बनावट देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे बाजार परिसरात दारुड्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

म्हैसगाव हे पश्चिम परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असल्याने येथे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. मात्र गावात परवानाधारक दारू दुकान नसतानाही भर चौकात आणि बाजारतळावर दिवसाढवळ्या अवैध दारू व गांजाची विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिकांच्या मते, प्रशासनातील काही संबंधितांच्या आशीर्वादामुळे हे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून आर्थिक तडजोडीतून संबंधितांना अभय मिळत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

बाजाराच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत काही जणांकडून धिंगाणा घालणे, महिलांना धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार वाढले आहेत. परिणामी महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक महिला बाजारात येताना असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत आहेत. गावात वारंवार भांडणे, मारामार्‍या आणि वादाचे प्रकार घडत असल्याने शांतता धोक्यात आली आहे.

विशेष म्हणजे, म्हैसगाव बाजारतळावर ग्रामदैवत लक्ष्मी माता मंदिर तसेच चाणकण बाबा मंदिर परिसरातही खुलेआम दारू व गांजाची विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धार्मिक स्थळांच्या परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या म्हैसगावमध्ये ‘पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आणि दारूचा सुकाळ’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची बोचरी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अवैध दारू विक्रेते आणि गांजा तस्करांचे वाढते मनोबल हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन म्हैसगाव परिसरातील अवैध दारू व गांजा विक्री तात्काळ बंद करावी, तसेच संबंधितांना अभय देणार्‍यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...