Saturday, May 4, 2024
Homeनगरम्हैसगावला वाळू तस्करांच्या दोन गटांत राडा

म्हैसगावला वाळू तस्करांच्या दोन गटांत राडा

राहुरी तालुक्यात वाळू तस्करीमुळे नागरिकांमध्ये दहशत

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नदीपात्रात पाणी ओसरताच बेकायदा वाळू उपसा सुरू झाला आहे. तर म्हैसगाव-कोळेवाडी भागात वाळूच्या व्यवहारावरून वाळू तस्करांच्या दोन गटांत चांगलीच खडाजंगी होऊन दोन्ही वाळू तस्करांनी एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखल्याने राहुरी तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बेकायदा वाळू उपसा बंद करून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेतील तुळशीराम काशीनाथ केदार (रा. चिखलठाण, ता. राहुरी) यास राहुरी पोलिसांनी अटक केली असून रवींद्र उर्फ पप्पू अप्पासाहेब शिंदे (रा. खांबे, ता. संगमनेर) हा पसार झाला आहे. राहुरी पोलिसांनी याबाबत शस्त्र बाळगल्याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या मुळा आणि प्रवरा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने वाळू तस्करांनी पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरू केला आहे. म्हैसगाव, शेरी चिखलठाण भागातही जोरदारपणे खुलेआम वाळू तस्करीला उधाण आले आहे. यांत्रिक अवजारांच्या साहाय्याने रात्रंदिवस मुळा नदीपात्रातून वाळूउपसा सुरू आहे. रविवारी म्हैसगाव-कोळेवाडी रस्त्यावर वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. प्रकरण गावठी पिस्तुलापर्यंत गेले. वाळू विक्रीच्या व्यवहारावरून ही घटना घडली. त्यामुळे राहुरी तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जातो. त्यामुळे या दोन्ही नदीकाठावरील शेती धोक्यात आली असून वाळू उपशामुळे शेतीबरोबरच पिण्याच्याही पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, वाळू तस्कर खुलेआम बेकायदा वाळूची उचलेगिरी करतात. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या तस्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या