मुंबई | Mumbai
ड्रीम इलेव्हन आयपीलमध्ये रविवारी मुंबई इंडियन्सची गाठ सनराईझर्स हैदराबादशी पडणार आहे. मुंबई संघाचे ४ सामन्यांमध्ये २ विजय आणि २ पराभवांसह ४ गुण आहेत तर हैद्राबादच्या खात्यातही ४ गुण आहेत.
हैदराबादने बंगळुरविरुद्ध आणि कोलकात्याविरुद्ध पराभवानंतर स्पर्धेत जोरदार पुनरागमन करताना दिल्ली कॅपिटल्स आणि बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला पराभवाची धूळ चारली आहे. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध आपली विजयी मोहीम अशीच कायम ठेवण्याचा हैद्राबाद संघाचा प्रयत्न असेल.
हैद्राबाद आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत १४ सामने झाले आहेत यात मुंबईने ६ तर हैद्राबादने ८ लढती जिंकल्या आहेत. दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना जिंकला असल्यामुळे नेमका कोणता संघ बाजी मारतो ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
मुंबई संघासाठी जमेची बाजू म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, सौरभ तिवारी चांगली फलंदाजी करत आहेत . मात्र सलामीवीर क्विंटन डिकॉकचे अपयश ही संघासाठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.
हैद्राबाद संघाबद्दल सांगायचे झाले तर डेविड वॉर्नर, मनीष पांडे चांगल्या फॉर्मात आहेत. पण संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर जॉनी बेरस्टो संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. तसेच दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ४१ धावा ठोकणारा केन विलियम्सन चेन्नईविरुद्ध स्वस्तात माघारी परतला होता. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.
तसेच चेन्नईविरुद्धच्या लढतीमध्ये तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. अद्याप ही दुखापत कितपत गंभीर आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. भुवनेश्वर कुमार हा हैद्राबादच्या गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. मुंबईविरुद्ध लढतीत तो खेळू शकेल की , नाही हे सांगणे कठीण आहे.
हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे येथे धावांचा पाऊस पडणार हे स्पष्ट आहे. दोन्ही संघाना विजयाची सामान संधी आहे. तसेच मुंबई आणि हैद्राबाद अनेक म्याचविनर खेळाडू आहेत त्यामुळे एक काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
सलिल परांजपे, नाशिक