मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली. आजच्या या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबई पोहोचले होते.
बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सत्या नडेला यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात उभारण्यात येणाऱ्या GCC – Global Capability Center या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. सुमारे २० लाख स्क्वेअर फूट क्षेत्रावर हा ग्लोबल केंद्र उभारला जाणार आहे. लवकरच मायक्रोसॉफ्टसोबत सामंजस्य करार (MoU) होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.
४५ हजार लोकांना जीसीसीद्वारे रोजगार उपलब्ध होतील. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. बैठकीत प्राईम AI OS ची चित्रफीत दाखवली. इतर क्षेत्रात AI कसा वापर करता येईल त्यांसदर्भात चर्चा झाली. कृषी, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांत AI ची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.
दरम्यान, भारतात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल 17.5 अब्ज डॉलर (सुमारे 1.57 लाख कोटी रुपये) गुंतवणार आहे. मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. AI, क्लाउड आणि डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा उभारणे, लाखो भारतीयांना नव्या AI कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि सुरक्षित डेटा इकोसिस्टम निर्माण करणे हा या गुंतवणुकीचा उद्देश असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले. गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांची ही विनंती सत्या नडेला यांनी मान्य केल्याचे स्पष्ट केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत लवकरच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





