अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागापूर एमआयडीसीतून कंपनीतून दोघांनी 94 हजार रूपये किंमतीच्या कॉपरच्या कॉईल्स चोरून नेल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते दोनच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रविवारी (24 नोव्हेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सुमेध किशोर गंधे (वय 33 रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मोटार वायडींगचा व्यवसाय आहे. त्यांची नागापूर एमआयडीसीतील ब्लाँक नंबर एल 227 येथे स्काँफर इलेक्ट्रीक सोल्युशन एल.एल.पी. या नावाने कंपनी आहे.
या कंपनीतून 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते दोन या वेळत दोघा अज्ञात चोरट्यांनी 94 हजार 85 रुपये किंमतीच्या 148 कॉपरच्या कॉईल चोरून नेल्या आहेत. सदरचा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्षात आला आहे. याबाबत गंधे यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. गंधे यांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत. दरम्यान, नागापूर एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या असून यात कंपनीत काम करणार्यांचा समावेश असल्याचे यापूर्वी घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.