श्रीगोंदा/बेलवंडी |प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील पिसोरे-लोणी परिसरातील नियोजित एमआयडीसीच्या जागेतून बेकायदा माती उत्खनन करून वाहतूक करणारे चार डंपर बेलवंडी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास जप्त केले. या कारवाईत चार डंपर व सुमारे 24 ब्रास माती असा एकूण 1 कोटी 40 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना दि. 27 सप्टेंबर रोजी पहाटे पिसोरे-लोणी परिसरातील नियोजित एमआयडीसी हद्दीतून बेकायदा माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह सापळा रचला. पहाटे 3 वाजता पथक चिंभळे शिवारातील येळपणेकडे जाणार्या रस्त्यावर पोहोचले. साडेतीनच्या सुमारास चिंभळेकडून येळपणेकडे जाणारे चार डंपर अडवून तपासणी केली. प्रत्येक डंपरमध्ये सुमारे सहा ब्रास माती होती. चालकांकडे माती वाहतुकीचा परवाना नसल्याचे तसेच माती नियोजित एमआयडीसीच्या जागेतून भरल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक डंपरची अंदाजे किंमत 35 लाख रुपये असून चार डंपरची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये, तर मातीची किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे.
या प्रकरणी संतोष अशोक अडागळे (23, रा. टाकळी लोणार), संतोष काशिनाथ इथापे (43, रा. लोणी व्यंकनाथ), यशवंत प्रकाश पवार (21, रा. लोणी व्यंकनाथ) आणि मनोज शत्रुघनप्रसाद गुप्ता (40, रा. शहडोल, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रांजली साळवे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग सुजितकुमार क्षीरसागर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रोहिदास खेडकर, भाऊसाहेब यमगर, दादासाहेब क्षिरसागर, भाऊसाहेब शिंदे, शरद गांगर्डे व मच्छिंद्र बर्डे यांच्या पथकाने केली.




