अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडीतील तपोवन रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या वैभव शिवाजी नायकोडी (वय 19) या युवकाचा खून करून मृतदेह जाळणार्या लपका सोमवंशी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यात ‘मोक्का’चे कलम वाढविण्यात आले आहे.
तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे 22 फेब्रुवारी 2025 रोजी अपहरण करून पळून नेले होते. मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता व नंतर मृतदेह एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकला होता. याबाबत त्याची आई सिमा शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, सावेडी) यांनी 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी एकूण 11 संशयित आरोपींविरूध्द अपहरण, खून, पुरावा नष्ट करणे आदी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, वैभवचे अपहरण करणार्या चौघांना तोफखाना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. त्यानंतर त्यांनी वैभवचा खून करून त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर इतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. संघटित गुन्हेगारी टोळीतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. एमआयडीसी हद्दीत दोन टोळ्यांच्या युध्दातून वैभवचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तोफखाना पोलिसांना दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी टोळीतील सर्व संशयित 11 आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला व तो विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांना सादर केला. महानिरीक्षक कराळे यांनी सदर टोळीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करण्यास परवानगी दिल्याने सदर दाखल गुन्ह्यात ‘मोक्का’चे वाढीव कलम लावण्यात आले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (अहिल्यानगर शहर) अमोल भारती करीत आहेत.
11 गुन्हेगारांचा सहभाग
या टोळीत एकूण 11 सराईत गुन्हेगारांचा सहभाग असून त्या सर्व जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ लपका विजय सोमवंशी (वय 23), टोळी सदस्य सुमित बाळासाहेब थोरात (वय 24), महेश मारूतीराव पाटील (वय 26), नितीन ऊर्फ निशीकांत अशोक ननवरे (वय 25), करण उर्फ तुंडा सुंदर शिंदे (वय 26), विशाल दीपक कापरे (वय 22), रोहित बापुसाहेब गोसावी (वय 20), विकास अशोक गव्हाणे (वय 23), स्वप्नील रमाकांत पाटील (वय 23), राहुल बंडु पाटोळे (वय 19) व ऋतिक उर्फ सोन्या मनोज घोडके (सर्व रा. नवनागापूर, एमआयडीसी) यांचा समावेश आहे.
पोलिसांची मेहनत फळाला
एमआयडीसीतून सुरू झालेल्या टोळी युध्दाचा भडका होवून वैभव नायकोडी या युवकाचा खून झाला. खुनी सोमवंशी टोळीविरोधात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याचे पोलिसांमोर मोठे आव्हान होते. यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, मंगेश गोठला व कल्पना चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, सुनील शिरसाठ, सुधीर खाडे, सुरज वाबळे, गोरक्ष काळे, मुस्ताक शेख, विनोद गिरी व सतिष त्रिभुवन यांनी मेहनत घेतली.