मुंबई | Mumbai
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या युध्दामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कुमकुवत झाल्या आहेत. यामुळे प्रमुख भारतीय निर्देशांक २ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी प्री-ओपनिंग सत्रातच शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
प्री-ओपनिंग सत्रात BSE Sensex तब्बल २,७०० हून अधिक अंकांनी कोसळलेला दिसत असल्याने काही वेळासाठी बाजारात मोठी घबराट पसरल्याचे पहायला मिळाले. सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच NIFTY 50 निर्देशांकही प्री-ओपनिंगमध्ये ५०० हून अधिक अंकांनी खाली आला. नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतरही घसरगुंडी कायम राहिली. एका टप्प्यावर सेन्सेक्स १,००० अंकांनी घसरला, तर निफ्टी ३२४ अंकांनी खाली व्यवहार करत होता.
सेंसेक्समध्ये मोठी घसरण
सेन्सेक्स १,१२३.९२ अंशांनी किंवा १.३८ टक्क्यांनी घसरून ८०,१६३.२७ वर आणि निफ्टी ३३१.६० अंशांनी किंवा १.३२ टक्क्यांनी घसरून २४,८४७.०५ वर व्यवहार करत आहेत. बाजारातील सुमारे ३६३ शेअर्स वधारले असून २,५५१ शेअर्स घसरले आहेत. तर १५४ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आशियाई बाजार आज मोठ्या प्रमाणात नकारात्मक व्यवहार करत आहेत. निक्केई २२५ सुमारे १.५ टक्क्यांनी, हँग सेंग २ टक्क्यांहून अधिक आणि आशिया-पॅसिफिक निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. यूएस इक्विटी-इंडेक्स फ्युचर्स देखील नकारात्मक व्यवहार करत होते.
हे स्टॉक्स घसरले
शेअर बाजारात आज सर्व सेक्टर इंडेक्स रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत, ज्यामध्ये रिअल्टी सेक्टरला २% घसरणीसह सर्वाधिक फटका बसलाय. इंटरग्लोब एव्हिएशन, लार्सन अँड टुब्रो, मारुति सुझुकी, एशियन पेंट्स आणि TMPV यांसारख्या प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, आजच्या ‘टॉप गेनर्स’मध्ये ONGC, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंडाल्को यांचा समावेश आहे. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही १% च्या घसरणीसह कमकुवत कल दिसून येत आहे.
दुसरीकडे, ओएनजीसी जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढला, कारण क्रूडच्या किमती वाढल्याने अपस्ट्रीम रिअलिझेशन वाढू शकते. भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंदाल्कोने देखील वाढ दर्शविली आहे.
युद्धाच्या परिणामामुळे सोमवारी जागतिक बाजारापेठांमध्येही परिणाम दिसून आला. ‘GIFT निफ्टी’ सुमारे ११० अंकांनी घसरून २५,२३० च्या आसपास व्यवहार करताना दिसला, तर ‘डाओ फ्युचर्स’मध्ये ३५० अंकांची घसरण आणि जपानच्या ‘निक्केई’ इंडेक्समध्ये सुमारे ६०० अंकांची कमजोरी नोंदवली गेली.
कच्चा तेलाच्या किमतीत वाढ
इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. आशियाई व्यवहारात Brent Crude तब्बल 13 टक्क्यांपर्यंत वाढला. नंतर किंमत काहीशी स्थिर झाली असली तरी टोकियो वेळेनुसार दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सुमारे 5 टक्क्यांनी वाढून 76.48 डॉलर प्रति बॅरलवर होता. तेलदरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती असून भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





