डॉ.उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभ्यासक
तब्बल 1400 कोटी रुपये खर्चून भारत सीमावर्ती भागांचा, तेथील पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करणार आहे. मेडिकल, धार्मिक, नियमित पर्यटनाप्रमाणे नव्याने विकसित होणारे हे मिलिटरी टूरिझम लक्षवेधी आहे. कारगिलला हजारो पर्यटक भेट देतात. तीच गोष्ट पँगाँग लेकची. ‘3 इडियटस्’मध्ये दिसलेल्या या रम्य परिसरात जाऊन फोटो काढण्यासाठी पर्यटक रांगा लावतात. हे मिलिटरी टूरिझम लवकरच वाढणार आहे.
गोळ्यांचा वर्षाव, बॉम्ब हल्ले, घुसखोरी, राजनैतिक डावपेच, लष्कराची गस्त, घुसखोरी, वाद आणि प्रहार, राजनैतिक बैठका हे सगळे घडत असते भारताच्या सीमेवर. म्हणतात ना, एकवेळ इतिहासाचे पुनर्लेखन होऊ शकते, वर्तमान आणि भविष्य बदलता येते पण भूगोल बदलता येत नाही. आपले शेजारी आपल्याला बदलता येत नाहीत. त्यांच्या कारवायांपासून देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर चोवीस तास खडा पहारा ठेवावा लागतो. सतत चकमकी, धुमश्चक्री घडत असतात. हवामान अत्यंत प्रतिकूल असते आणि मैलोन्मैल गोठवणारा बर्फ असतो किंवा तप्त वाळवंट अथवा घनदाट झाडी. एकूणच सीमावर्ती भाग म्हणजे महाभयंकर जागा अशीच आपली धारणा आहे आणि ती बहुतांश सत्यही आहे. मी अनेकदा सीमेवर जाऊन भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जवानांसोबत कार्यक्रम सादर केला आहे. ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील शाळा-शाळांतील मुलांनी पाठवलेल्या पत्ररूपी राख्या घेऊन पार फॉरवर्ड पोस्टपर्यंत गेलो आहे. तिथले खडतर आयुष्य अनुभवले आहे. एनएचपीसी या कंपनीने उभारलेली अनेक धरणे भारतीय सीमेवर आहेत. तिथे भेट दिली आहे. असंख्य वेळा राजस्थान, मणिपूर, जम्मू-काश्मीर, अरुणाचल, आसाम, पंजाब इथल्या सीमांवर जाऊन आलो आहे. एक गोष्ट नि:संशयपणे सांगतो, बहुतांश भारतीय सीमा आणि तिथले निसर्गसौंदर्य निव्वळ अफलातून आहे. काश्मीर म्हणजे श्रीनगर आणि पहेलगाम नाही तर सीमेजवळील भागातील गुर्हेज हा दर्याखोर्यांचा प्रदेश म्हणजे खरा काश्मीर. अनेक ठिकाणी बॉर्डरपलीकडील घरे, माणसे, त्यांचे रोजचे जीवन व्यवहार अगदी लख्खपणे दिसतात. मधून वाहणारी एखादी नदी अथवा ओढा आणि दोन्ही बाजूंना कुंपणे.. एवढीच काय ती खूण.
काल-परवापर्यंत याच मार्गातून व्यापार सुरू होता. नागरिकही ये-जा करायचे. पण आता सर्वच ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. वातावरणात शांतता असली तरी एकप्रकारची सतर्क अस्वस्थता आहे. अशा अस्वस्थ सीमा भागात अलीकडेच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली तीदेखील अरुणाचल, चीनच्या सीमावर्ती भागात. अर्थात, यातून चीनला खणखणीत संदेश मिळाला. किबीतू हे अरुणाचलमधील सीमालगत भागातील पहिले गाव. (भारतातील शेवटचे नव्हे) मागच्या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक नियंत्रण रेषेजवळ व्हायब्रंट व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली. या दोन्ही बाबींची दखल घेणे आवश्यक आहे. याचे कारण चीन आपल्या सीमावर्ती भागात अशाप्रकारची 600 मॉडेल गावे विकसित करत आहे. हे सर्व काम सिक्कीम, अरुणाचल यांच्याशी भिडणार्या चीनच्या सीमावर्ती भागात सुरू आहे. या मॉडेल व्हिलेजमागचा हेतू दुहेरी आहे. इथे सर्वसामान्य नागरिक वस्तीला आहेत असे दाखवायचे, पण प्रत्यक्षात तिथे एकही नागरिक दिसत नाही. या सीमावर्ती भागापासून मनुष्यवस्तीचा चीनचा भूप्रदेश आणि तिथले शहर तब्बल दोन हजार किलोमीटर दूर आहे. मग इथे चीनने असली माणसांची गावे अत्याधुनिक सोयी-सुविधांसकट सर्व पायाभूत सोयींनी युक्त अशी का बरे बांधावीत?
लोकसंख्येच्या घनतेच्या निर्देशांकात चीनचा हा प्रदेश अत्यंत तुरळक लोकवस्तीसाठी निर्देशित केला आहे. मग इथे प्रशस्त रस्ते, उंच इमारती, अगदी खेळायची मैदाने आणि बागा कशासाठी विकसित होत आहेत? आणि तेही भारतीय सीमेपासून काही मीटरच्या अंतरावर? यामागील दुसरा हेतू म्हणजे स्थानिकांच्या वसाहतीची सुविधा म्हणून दाखवायचे आणि प्रत्यक्षात तिथे मोठे लष्करी ठाणे उभे करायचे. या भागात लहान मुले कधी दिसत नाहीत मग त्यांच्यासाठीच्या बागा कोणाला फसवायला केल्या जात आहेत? आणि मग तिकडे टेहाळणीचे बुरूज आणि गस्तीची मचाणे का उभी राहत आहेत? अशा इमारतींमधून नेमके किती प्रमाणात लष्कर आले आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. हे सर्व गेली काही वर्षे अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. या लाल रंगांच्या उंच इमारतींच्या भीतीपल्याड नेमके काय चालले आहे, हा खरा सवाल आहे. अशा ठिकाणी गृहमंत्र्यांनी जाणे हे विशेष. याचा अर्थ तिथे सुरू होणारा प्रकल्प हा गृहखात्याच्या अख्यत्यारित होणार, हे उघड आहे. म्हणजेच ही अंतर्गत बाब आहे. याचा लष्काराशी संबंध नाही. भारतीय भूभागावरील सीमावर्ती भागात बांधिली जाणारी घरे ही नेमकी कशासाठी, याचाही उलगडा व्हायला हवा. पूर्वी लडाखमध्ये पर्यटन चांगलेच बहरले होते. ‘3 इडियटस्’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर पँगाँग तलावासमोर पर्यटनगृहाच्या आणि तंबूच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात उभ्या राहिल्या होत्या. पण गलवान खोर्यात झालेल्या भारत-चीन संघर्षानंतर तिथले पर्यटनच थंडावले.
आता तब्बल 1400 कोटी रुपये खर्चून भारत या सीमावर्ती भागांचा, तेथील पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करणार आहे. आपल्याकडे जसे मेडिकल टूरिझम, धार्मिक टूरिझम, निव्वळ पर्यटनासाठी केलेला प्रवास आहे; तसेच नव्याने विकसित होणारे हे मिलिटरी टूरिझमही आहे.. आश्चर्य वाटले ना? पण मग कारगिलला दिलेली भेट आठवली. तिथे कारगिल युद्धातील शहिदांचे स्मारक आहे. हवामान अनुकूल असते तेव्हा तिथे अक्षरश: हजारो पर्यटक भेट देतात. मोठा रोमांचित करणारा अनुभव असतो तो. युद्धातील विजयाची स्मृती म्हणून ‘कारगिल दिवस’ साजरा करतात. तेव्हा तर त्या भागातील सर्व हॉटेल्स, धर्मशाळा, लॉज गर्दीने ओसंडून वाहत असतात. अगदी ‘ट्रॅफीक जाम’ची परिस्थिती येते. संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारावलेले असते. असे असले तरी रस्ते उपलब्ध केले आणि राहायच्या सोयी उपलब्ध केल्या तर काय गर्दी होते हे पाहायला वाघा बॉर्डरला जायला हवे. इथे संध्याकाळी जत्रा भरते आणि देशप्रेमाच्या गाण्यांनी ऊर भरून येतो.
‘मिलिटरी टूरिझम’ ही आज अवास्तव कल्पना वाटत असली तरी ती प्रत्यक्षात येत आहे. त्याचे स्वागत करायला हवे.