Friday, November 22, 2024
Homeनगरदूध भेसळविरूद्ध कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन

दूध भेसळविरूद्ध कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दुधाला 40 रुपये प्रती लिटर भाव मिळावा, दूध भेसळ कायमची बंद करून प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यांसाठी राज्यातील 288 आमदारांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही शेतकरी संघटनेच्यावतीने पत्र देणार आहोत. विधानसभेत या अधिवेशनात दूध प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा राज्यभर दूध आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी सरकारला दिला. काल मंगळवार दि. 25 जुलै रोजी दूध उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेसचे आ.लहू कानडे व करण ससाणे या दोन्ही गटांसह संभाजी ब्रिगेडनेही सहभाग घेऊन पाठिंबा दिला.

- Advertisement -

सकाळी 10.30 वाजता श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर हरेगाव फाट्यावर सुरू झालेल्या आंदोलनाची दोन तासाने 12.30 वाजता शांततेच्या मार्गाने सांगता झाली. दोन्ही बाजूने दोन कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अ‍ॅड. अजित काळे म्हणाले, शांततेच्या मार्गाने आम्ही शेतकर्‍यांच्या दुधाला हक्काचा 40 रुपये भाव मागतो. आज 22 रुपये 90 पैसे भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. 27 जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभेतील 288 आमदारांना या प्रश्ना संदर्भात पत्र पाठविणार आहे. दूध प्रश्नावर विधानसभेत चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक केली नाही. तर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी एकजूट होऊन तिसरी आघाडी काढून दणका देऊ.

श्रीरामपूरपासून सुरू होणारे आंदोलन आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचवू. राज्यातील वरिष्ठ नेते दूध आंदोलनात सक्रीय होणार असल्याचे समजते. शेतकरी प्रश्नावर कुणी पुढे येत असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू. राजकीय फायद्यासाठी कुणी आंदोलन करत असेल तर आम्ही गय करणार नाही, या दूध भेसळ गोरक धंद्यासह सर्व दूध व्यावसायिकांची साखळी असून, या सर्वांना आजचे महायुती सरकार पाठीशी घालत आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोयाबीन, दूध यास योग्य भाव मिळत होता. परंतु महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जी आर बदलण्यात आला असल्याचा आरोप अ‍ॅड. अजित काळे यांनी केला.

शिवसेना (उबाठा) उपनेते व पुर्वीचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.आपल्याला तीन टप्प्यात आंदोलन करायचे आहे. पहिला टप्पा रस्त्यावरची लढाई, दुसरी न्यायालयीन, तिसरी निवडणूक रणांगणात असणार आहे. दूध भेसळीचे दुष्परिणाम हे सरकार समजून घ्यायला तयार नाही. बाळंतीण महिलेने सकाळी आंबट बोरं खाल्ली तर सायंकाळी तान्ह्या बाळाला त्रास जाणवू लागतो. याच तान्ह्या बाळाला या केमिकलयुक्तदुधाने काय त्रास होत असेल. सरकारला आपण विनंती करतो लहान बाळाच्या जीवाशी खेळणारा कायदा अधिक कडक झाला पाहीजे. भेसळखोर कायमचा कस्टडीत राहणारा अजामीनपात्र कायदा आणला पाहीजे. स्व.बबनराव काळे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळ चालवित आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेना पक्षाने आपल्यावर सोपवली असून त्यांच्या या लढ्याला आपण उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सामील झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील एकही जेल नाही की त्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या अटकेत आपला मुक्काम झाला नाही. आतापर्यंत 22 दिवाळी सण आपण जेलमध्ये घातले. माझ्यावर पुढारी, अधिकारी बडविलेल्या 84 केसेस होत्या. आता दूध आंदोलनात शेतकरी भावांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आमच्या दुधाला अधिवेशन संपवायच्या आत न्याय मिळाला नाही तर आपण रस्त्यावर द़ंडुके घेऊन उतरू. त्याहीपुढे जाऊन घरांवर मोर्चे काढू. कोण पालकमंत्री, कोण कोणत्या खात्याचा मंत्री ही बाब आपल्यादृष्टीने किरकोळ असल्याचे वडले म्हणाले. या आंदोलनप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिणीस हेमंत ओगले, बाजार समिती सभापती सुधीर नवले, शिवसेना (उबाठा) संजय छल्लारे, संभाजी बिग्रेडचे बाबा भांड, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, रूपेश काले, अंबादास कोरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, उंदिरगाव दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने सागर गिर्‍हे, प्रकाश ताके, दीपक ढगे यांची भाषणे झाली.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे हरि आप्पा युवर, प्रभाकर कांबळे, गोविंद वाघ, शरद आसने, बाळासाहेब आसने, डॉ. रोहित कुलकर्णी, ज्ञानेश्वर सोडणार, त्रिंबक भदगले, साहेबराव चोरमल, डॉ. नवले, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, डॉ. दादासाहेब आदिक, भागचंद औताडे, सुदाम औताडे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुध्दे, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, माळवाडगावचे उपसरपंच श्याम आसने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख लखन भगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरत आसने आदींसह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनात शेतकर्‍यांची एकजूट दिसली
याआगोदर तालुक्यात अनेक शेतकरी आंदोलने झाली, परंतु पूर्ण ताकदीनिशी शेतकरी रस्त्यावर उतरला नव्हता. परंतु काल मंगळवारी झालेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रास्तारोको आंदोलनात सर्व शेतकरी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यामुळे आता महायुती सरकारला येणार्‍या अधिवेशनात दूध दराबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा हे आंदोलन राज्यभर पेट घेईल, हे नक्की.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या