Thursday, August 20, 2026
HomeनगरAhilyanagar : भेसळीच्या संशयावरून दूध नष्ट, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Ahilyanagar : भेसळीच्या संशयावरून दूध नष्ट, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

मेहकरीच्या दोन दूध संकलन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील मेहकरी येथे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (10 जुलै) दूध भेसळीविरोधात छापेमारी केली होती. या कारवाईत संशयास्पद स्वरूपात नॅनो युरिया व डिटर्जंट पावडर आढळून आल्याचे समोर आले आहे. तसेच आवश्यक परवाना व नियमांचे उल्लंघन, अपमिश्रके साठवून ठेवल्याचा संशय आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मेहकरी येथील सद्गुरू दूध संकलन केंद्र आणि दुसर्‍या एका दूध संकलन केंद्रावर एकाच दिवशी तपासणी केली. या कारवाईत नाशिक व नगरचे अधिकारी आणि पंच उपस्थित होते. सद्गुरू दूध संकलन केंद्रात गोटीराम हरिभाऊ वनवे हा विक्रेता म्हणून उपस्थित होता. तपासणीदरम्यान दूध वाहतुकीसाठी नोंदणी असली तरी दूध संकलन व शीतकरणासाठी आवश्यक नोंदणी नसल्याचे निदर्शनास आले. केंद्रात मोठ्या प्रमाणात गाई व म्हशीचे दूध संकलित करून शीतकरण केले जात असल्याचेही आढळले. तपासणीदरम्यान केंद्राबाहेरील पत्र्याखाली गुलाबी प्लास्टिक पिशवीत नॅनो युरिया प्लस असे लिहिलेली प्लास्टिक बाटली आणि व्हील कंपनीची डिटर्जंट पावडर आढळून आली. विक्रेत्याने हे साहित्य आपले नसून अज्ञात व्यक्तीने ठेवून गेल्याचा दावा केला. अधिकार्‍यांनी चाचणीद्वारे दुधाची तपासणी केली असता युरिया, डिटर्जंटसह इतर भेसळीच्या प्राथमिक चाचण्या नकारात्मक आल्या. त्यानंतर गाईचे व म्हशीचे प्रत्येकी दोन लिटर दूध विश्लेषणासाठी नमुने म्हणून जप्त करण्यात आले.

उर्वरित दूध नियमांचे उल्लंघन होत असल्याने जप्त करून नष्ट करण्यात आले. गोटीराम वनवे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच दिवशी दुसर्‍या दूध संकलन केंद्राची तपासणी केली. तेथे मालक कुंडलीक यादव देवकर उपस्थित होता. तपासणीदरम्यान शेडच्या पत्र्यावर 500 मिली नॅनो युरियाची बाटली आणि पांढर्‍या पिशवीत डिटर्जंट पावडर आढळली. संबंधितांनी हे साहित्य आपले नसल्याचा दावा केला. येथेही करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये भेसळ आढळून आली नाही. या केंद्रातून गाईच्या दुधाचा दोन लिटर नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. उर्वरित दूध कमी दर्जाचे असल्याचा संशय आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने जप्त करून नंतर नष्ट करण्यात आले. कुंडलीक देवकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...