Saturday, July 27, 2024
Homeनगरदुधासह दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

दुधासह दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दुध भेसळ रोखण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून अन्न, औषध आणि जिल्हा दुग्धविभागाने तपासणी मोहीम राबवली. या माहिमेत अन्न, औषध विभागाने संशयित 12 हजार 658 लिटर दुध, 509 किलो दही व 19 किलो तूप नष्ट केले आहे. यासह दूध भेसळ अथवा दुधाच्या दर्जाबाबत संशय आल्याने दुधाचे 60 नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात दुधात होणारी भेसळीला पायबंद घालण्यासाठी 1 सप्टेंबरपासून अन्न, औषध विभागाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली होती. या माहिमेत गेल्या 15 दिवसात 4 लाख 46 हजार रुपये किंमतीचे कमी गुण प्रतीचे दुध व दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. पशूसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार तसेच अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी व अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागुडे, समिती सदस्य अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खेरे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रमोद काकडे व मनिष सानप, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र नितिन उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर दुध संकलन केंद्र, प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी तपासणी मोहिम अथवा धाडी घालण्यात आल्या.

या धडक मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी गुण प्रतीचे आढळून आलेले 12 हजार लिटर दुध, 509 किलो दही व 19 किलो तूपे नष्ट करण्यात आले. विविध तालुक्यातील नष्ट केलेल्या या दुध व दुग्धजन्य पदर्थांची किंमत चार लाख 46 हजार रुपये आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थाचे 60 नमुने पुढील तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच वजन मापे प्रमाणिकरण व त्रुटी संदर्भात 23 ठिकाणी कारवाई तपासणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मोहिमांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, प्रदीप कुटे, डॉ. प्रदीप पवार व अश्विनी पाटील तसेच व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनवणे, डॉ. वसंत गारुडकर, व तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या