Tuesday, November 5, 2024
Homeनगरमहिनाभरात दूध खरेदी दरात चार ते पाच रुपयांची घसरण; शेतकरी चिंतेत

महिनाभरात दूध खरेदी दरात चार ते पाच रुपयांची घसरण; शेतकरी चिंतेत

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

राज्यात शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जाणार्‍या गाईच्या दुधाचे दर दूध संघचालकांनी कमी करत प्रति लिटरचा दर 38-39 रुपयांवरून 31-32 रुपयांवर आणला. मात्र दूध संघाकडून पॅकिंग करून विकल्या जाणार्‍या दरात एक रुपयाही कमी केला नाही.

- Advertisement -

आजही गाईच्या पॅकिंग दुधाचा दर पूर्वीप्रमाणे 40 रुपयांच्या पुढे आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडून खरेदी केले जाणारे दूध दर हे 3.5 व 8.5 फॅटचे आहे. दूध संघाकडून विकले जाणारे दूध हे टोण्ड दूध आहे. आमच्याकडून खरेदी केल्या जाणार्‍या दुधाचे दर कमी झाले, तर तुमच्याकडून विकल्या जाणार्‍या दुधाचे दर कायम कसे, असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय उत्पादक शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाच्या दरात महिनाभरापासून घसरण सुरू झाली आहे. प्रति लिटरला मिळणारा 38 रुपयांचा दर सध्या 30-32 रुपयापर्यंत खाली आला आहे. देशांतर्गत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात असले तरी मात्र यांच्यात दुग्धव्यवसाय करणारे मात्र भरडून निघाले जात आहे. दुधाचे दर कमी होऊ लागताच दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या आर्थिक तोट्याचा धंदा होऊन बसला आहे. दर टिकून राहण्यासाठी समिती केली. किमान उपाययोजना करण्याचे जाहीर केले. मात्र आश्वासनानंतर तीन ते चार रुपयांनी दर अजून खाली आले आहेत.

किमान 40 रुपये दर कायम राहावा यासाठी अद्याप उपाययोजना केल्या नाहीत. पशुखाद्याचे दरही कमी झालेले नाही. त्यामुळे दूध धंदा तोट्यात जात असल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत.

राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी शेतीला दूध व्यवसायाची जोड दिलेली आहे. राज्यात साधारण 70 सहकारी व 300 पेक्षा जास्त खासगी दूध संघाच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील चाळीस टक्के दुधाची पावडर, बटर होते, तर साठ टक्के दूध ग्राहकांना पाऊच (पिशवी)मधून विकले जाते. याशिवाय तीस ते चाळीस लाख म्हशींच्या दुधाची थेट ग्राहकांना विक्री व इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. करोना महामारीच्या काळात मागणी घटल्याने दुधाचे दर कमालीचे खाली आले होते. त्याआधीही दुधाचे दर सतत पाडले जात होते. अगदी दुधाचा दर 18 रुपयांपर्यंत खाली आल्याने राज्यभरातून काही शेतकर्‍यांनी आंदोलनही केले होते. आता सहा महिन्यांपासून दुधाचे दर बर्‍यापैकी वाढले होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गाईच्या दुधाला प्रति लिटर 38-39 रुपयांपर्यंत दर मिळत होता. पण आता दूध दर पाच ते सहा रुपयाने कमी झाले आहे.

गेल्या महिनाभरात मात्र गाईच्या दुधाचे दर खरेदीदारांनी काही ठिकाणी तर सात ते आठ रुपयांनी खाली आणले आहेत. दुधाचे दर कमी होऊ लागताच पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी समिती नियुक्त केली. शिवाय दुधाचे दर 35 रुपयांच्या खाली येणार नाही याची काळजी सरकार घेईल. पशुखाद्याचे दर पंचवीस टक्क्यांनी कमी करण्याच्या उपाययोजना केल्या जातील, असे जाहीर केले. मात्र त्याबाबत अद्याप काहीही झाले नसल्याने हे सांगितल्यानंतर चार ते पाच रुपयांनी दूधदर खाली आले आहेत. सध्या दुधाला 30 ते 32 रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे दर कमी होत असल्याने आता कुठे सावरायला लागलेले दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्याचा दुधाला मिळणारा दर आणि पशुखाद्याचे दर पाहता मिळणारी अर्धी रक्कम पशुखाद्यावरच खर्च होत आहे. चारा, मजुरीचा विचार करता दूध व्यवसाय सध्या दुधाला 38-39 रुपये दर मिळत होता, त्यावेळी हा दुग्ध व्यवसाय जेमतेम परवडणारा होता. खाद्याचे दर कमी व्हायला पाहिजे मात्र ते केले जात नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर दूध व्यवसाय धंदा पुन्हा मोडकळीस येऊ शकतो.त्यामुळे दुधाचे दरात सुधारणा करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत.

– अमोल आचपाळे, दूध उत्पादक शेतकरी पाचेगाव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या