Thursday, September 19, 2024
Homeनगरदूध उत्पादक शेतकर्‍यांचे संगमनेरात ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन

दूध उत्पादक शेतकर्‍यांचे संगमनेरात ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन

शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारात ओतले शेण || प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेल्या सतरा दिवसांपासून कोतूळ (ता. अकोले) येथे धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोलेसह संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर रॅली काढून संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारात शेण ओतून मंगळवारी (दि. 23 जुलै) आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी काही शेतकर्‍यांनी दुधाने अंघोळ करत जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

कोतूळ येथून दूध उत्पादक शेतकर्‍यांचा ट्रॅक्टर घेऊन मोर्चा मंगळवारी दुपारी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोर आला होता. यावेळी शहरातून नाशिककडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर उभे होते. विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारात दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दुधाने अंघोळ केली. दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, जय जवान जय किसान, या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कोणत्याही परिस्थितीत दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांची होती. त्यानंतर संतप्त झालेल्या उत्पादकांनी शेण भरून आणलेली ट्रॉली विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारात खाली करत घोषणा दिल्या.

यावेळी अनेक शेतकर्‍यांनी दुधाचे कॅनही आणले होते. सातत्याने दुधाचे भाव कमी होत आहेत तर दुसरीकडे जनावरांच्या पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे सगळीकडूनच मरण होत आहे. पण याचे सरकारला काही देणे-घेणे नाही अशा संतप्त भावनाही अनेक दूध उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. यावेळी डॉ. अजित नवले यांच्यासह दूध उत्पादक शेतकर्‍यांचे विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी स्वीकारले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, आजच्या आंदोलनानंतरही कोतूळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, सदाशिव साबळे, अभिजीत सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गिते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजी भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदिंनी केले. तर अमित भांगरे, संदीप शेणकर, राहुल शेटे, नितीन नाईकवाडी, महेश नवले, सचिन शेटे, शुभम आंबरे, दत्ता ढगे, सागर वाकचौरे, संदीप दराडे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या