पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर 30 रुपये तसेच अनुदान 5 रुपये असा भाव ठरवून दिलेला आहे. ज्या खासगी संस्था दुधाला योग्य भाव देणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. खंडकरी शेतकरी वर्गाला भोगवटादार वर्ग -2 ऐवजी भोगवटादार वर्ग- 1 चा सातबारा प्रदान समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खंडकरी चळवळीचे ज्येेष्ठनेते निवृत्ती चव्हाण हे होते. यावेळी आ. आशुतोष काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले, खंडकरी शेतकर्यांच्या हक्कासाठी या लढ्याचे नेतृत्व कै. बाळासाहेब विखे, सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे, माधवराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. त्यामुळेच या लढ्याला यश आले.
त्यामुळे खंडकरी शेतकर्यांना त्यांच्या खंडाच्या जमिनी परत मिळाल्या. मात्र सातबारावर भोगावटादार वर्ग दोन असा उल्लेख असल्यामुळे या जमिनीचे व्यवहार करणे, कर्ज काढणे शक्य होत नव्हते. शेतकर्यांना अनेक अडचणी येत होत्या. काही व्यवहार करावयाचा असेल तर 50 टक्के नजराणा भरावा लागत होता. पुणतांबा, शिंगवे, रास्तापूर शिवारातील खंडकरी शेतकर्यांना अंदाजे 35 कोटी रुपये नजराणाची रक्कम येत होती. राज्य सरकारने ही रक्कम माफ केली. तसेच या प्रशाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांशी चर्चा करून जमिनीवर भोगावटादार-1 करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खंडकरी शेतकर्यांना न्याय देण्याच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचे आम्हास भाग्य मिळाले.
शेतकरी वर्गाला विम्यापोटी 1500 कोटी रुपयाची अग्रिम रक्कम मिळालेली आहे. तसेच ज्यांच्या उतार्यावर पोटखराबा ही नोंद असेल त्या तातडीने नियमित करण्याच्या सूचना त्यांनी महसूल विभागाला दिल्या. नाशिक जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला असून गोदावरी नदीपात्रात 54 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकरी वर्गाला वार्यावर सोडले होते. मात्र महायुती सरकार हे सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, बेरोजगार यांचे हितसंबंध जपणारे सरकार आहे. येत्या रक्षाबंधनाच्यावेळी लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याप्रमाणे रक्कम अदा करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीचे नेते कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून व हळद लावून बसले तरी पुन्हा महायुतीचेच सरकार येणारच असे त्यांनी आर्वजून स्पष्ट केले. आ. काळे यांनी ग्रामीण भागात घरकुलांना जागा मिळत नाही त्यामुळे गावठाणाची हद्द वाढविण्याची गरज असून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. प्रास्तविक डॉ.धनजंय धनवटे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय धनवटे यांनी केले. आभार संगहता भोरकडे यांनी मानले.
मागील महसूलमंत्री ‘वसुली मंत्री’ !
आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता ना. विखे पाटील यावेळी म्हणाले, मागील महसूलमंत्री हे वसुली मंत्री होते. 2005 मध्ये राज्यमंत्री असताना त्यांच्या काळात समन्यायी कायदा संमत झाला. त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त आज येथील शेतकरी वर्ग भोगत आहे.मेंढेगिरी अहवालात पाण्याच्या बाष्पीकरणाची टक्केवारी 33 टक्के होती ती आता 12 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, असेही ना. विखे यांनी यावेळी सांगितले.