पुणे | प्रतिनिधी
अमूल आणि मदर डेअरीच्या दूध विक्रीच्या दरवाढीनंतर राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघाने म्हशीच्या आणि गायीच्या दूध विक्री दरात चार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. सोमवार (दि. १६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या या दरवाढीचा फटका बसणार आहे.
यासंदर्भात शुक्रवारी (दि. १३) कात्रज डेअरी येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक झाली. या बै ठकीला राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध संघाचे ४५ ते ५० पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. डिझेलच्या दरातील वाढ, वाहतूक खर्च, साखरेचे वाढलेले दर, पॅकिंग साहित्य आणि मनुष्यबळावरील खर्चात झालेली वाढ यामुळे दूध विक्री दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाचे दरही वाढले आहेत. आगामी काळात दूध खरेदी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूधाचे दर आणखी वाढण्याची शकयता आता निर्माण झाली आहे. या दरवाढीमुळे उत्पादन, पॅकिंग आणि वाहतुकीच्या वाढत्या खर्चाचा समतोल साधण्यास मदत होणार असून दूधउत्पादकांना योग्य मोबदला देणे शक्य होणार असल्याचे दूध उत्पादक व प्रकिया कल्याणकारी संघाने
म्हटले आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण सिताराम चांभारे यांनी आभार मानले. मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी ही दूध दरवाढीची माहिती दिली.



