श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
शिरूर-श्रीगोंदा रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरु असून त्यासाठी पाचशे ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून लाखोे ब्रास मुरूम खोदून नेण्यात आल्याचा गैरप्रकार उघड झाला आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. यामुळे निसर्गाचे नुकसान होत असून शासनाचाही महसूल बुडत आहे. गैरप्रकार करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिीकांनी केली आहे.
गव्हाणेवाडी फाटा ते श्रीगोंदा या 200 कोटी रुपये खर्चाच्या 43 किलोमीटर रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. त्यासाठी नाममात्र रॉयल्टीवर लाखो ब्रास मुरूमाचे उत्खनन करुन सरकारची फसवणूक करण्यात आली असून महसूल प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कामांसाठी लागणारी खडी, मुरुम याचे स्वामीत्वधन भरण्याची तरतूद कामाच्या निविदा सुचनेत असताना तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागात माहिती घेतली असताना केवळ पाचशे ब्रास ची रॉयल्टी या कंपनीने घेतली असून अजून पाचशे ब्रासची परवानगी मागितली असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत लाखो ब्रास मुरूम आणि माती या रस्त्यावर टाकण्यात आली आहे.
दरम्यान, हा रस्ता गव्हाणवाडी फाट्यापासून श्रीगोंद्यापर्यंत रस्ता मजबुतीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे दोन फुटा पासून पाच फूट पर्यंत खोदलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. शिरूर-गव्हाणेवाडी पासून बेलवंडी मार्गे श्रीगोंदा येणारा महत्वाच्या रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. ठेकेदाराचा गलथान कारभार आणि रस्ते प्रशासनाने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. दिशादर्शक फलक नाहीत, रस्त्यावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. याबाबत तक्रार करुनही संबंधित अधिकार्यांनी हातवर केले आहेत.
पंटरच बनलेे ठेकेदार
रस्त्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीने नेमलेल्या मुख्य ठेकेदाराने कामात अनेक सबठेकेदार नेमले आहेत. त्यामध्ये स्थनिक नेत्यांच्या पंटरांना ठेकेदार करण्यात आले आहे. रस्त्याचे एक-दोन किलोमीटर अंतराचे टप्पे करत रस्त्याचे काम वाटून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.