Saturday, May 4, 2024
Homeनगरतळेगाव येथे कोविड आरोग्य मंदिरामुळे नागरिकांना दिलासा - ना. थोरात

तळेगाव येथे कोविड आरोग्य मंदिरामुळे नागरिकांना दिलासा – ना. थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

करोना हे संपूर्ण मानवजातीवरील संकट आहे. कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते. त्यामुळे त्या कुटुंबाला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. आपल्या कुटुंबातील कोणीही करोना बाधित होणार नाही, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून करोना संकटात तळेगाव येथील कोविड आरोग्य मंदिराचे कार्य कौतुकास्पद ठरले. तळेगाव येथील कोविड आरोग्य मंदिरामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील व सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोविड आरोग्य मंदिरास भेट व परिसरातील विविध गावांमधील पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पंचायत समिती सदस्या बेबीताई थोरात, उपसरपंच रमेश दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, भारत मुंगसे, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, प्रभाकर कांदळकर, हौशीराम सोनवणे, अशोक थोरात, गणेश दिघे, संपतराव दिघे, अमोल दिघे, रावसाहेब दिघे, भाऊसाहेब दिघे उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, करोना संकटात महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे. कधीही करोना रुग्णांची आकडेवारी लपवली नाही. त्यामुळे रुग्ण संख्या जास्त दिसते आहे. मात्र रुग्णांचा शोध घेतल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना लवकर बरे होता आले आहे. परिणामी मृत्यूचा दर घटला आहे. ज्या राज्यांनी करोनाचे आकडे लपवले, त्यांची अवस्था काय आहे ते सर्व जग पाहते आहे. गंगेच्या कडेला मृतदेह साचले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला माणूस वाचवायचा आहे. आगामी करोना ची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मागील पाच वर्षात निळवंडेच्या कालव्यांची कामे ठप्प होती.

मात्र 2019 मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी कालव्यांची बैठक घेऊन या कामांना गती दिली करोनाचे संकट असतानासुद्धा कामांचा वेग खूप चांगला आहे. लवकरात लवकर कालव्याद्वारे या दुष्काळी भागाला पाणी देणे हाच आपला ध्यास आहे. अनेकांनी याबाबत राजकारण केले ते आता जनतेला कळले आहे. करोना संकटात अनेक कुटुंबांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. करोना पासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेकजण मास्कचा वापर करत नाही आणि त्याचा परिणाम बाधित होण्यामध्ये होतो.

एक व्यक्ती बाधित झाली तरी संपूर्ण कुटुंब बाधित होते आणि त्या कुटुंबाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण गेले. करोनाच्या संकटात अनेक ठिकाणी सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या ही कोवीड केअर सेंटर ही खरी आरोग्य मंदिर ठरली आहेत. तळेगाव परिसरातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या कोविड आरोग्य मंदिरात अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप परतले असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, प्रत्येकाने करोना रोखण्याकरता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण निष्काळजीपणा केला तर लहान मुलांवर तिसरी लाट बेतू शकते. यामध्ये अनेकांचे प्राण जाऊ शकतात. काळजी घेणे हाच करोनावर सर्वोत्तम उपाय आहे .

तळेगाव व निमोण गटातील प्रत्येक गावाच्या करोना स्थितीचा आढावा घेत महसूल मंत्री थोरात यांनी उपाययोजना सुचविल्या. प्रसंगी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे यांनी तळेगाव येथील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोविड आरोग्य मंदिरास 51 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश महसूल मंत्री थोरात यांच्याकडे सुपूर्द केला. कोविड आरोग्य मंदिरास तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिसरातील डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, नर्स, आशा सेविका, पदाधिकारी व स्वयंसेवी कार्यकर्ते यांचेही मोठे सहकार्य लाभले. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले, तर सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी आभार मानले.

निळवंडे प्रश्नी झारीतील शुक्राचार्य उघडे पडले..

दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. ते आपण अनंत अडचणीवर मात करून पूर्ण केले. मागील पाच वर्षांत भाजपाची सत्ता होती त्यावेळेस काम अतिशय संथ गतीने होते आता नव्याने पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला मोठी गती दिली. त्यावेळी लोकांचे मन दूषित करणारे आता जनतेने ओळखले असून झारीतील शुक्राचार्य उघडे पडले असल्याचे टीकास्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सोडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या