नाशिक | Nashik
राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच अजित पवारांनी रविवारी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना मोठे विधान केले होते. “एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा”, असे अजित पवारांनी म्हटले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक भाष्य केले आहे.
अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. अजित पवार निवडणूक लढविणार, मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी ७८ वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात, वय आहे ते तो काही मुद्दा नाही, असे भुजबळ म्हणाले.
पुढे ते असे ही म्हणाले की, “महायुतीमधील पक्षांना जर चांगले यश मिळवायचे असेल तर मला वाटते महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये. कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळते. शेवटी सर्वांचे लक्ष्य एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधाने करू नये”, असा सल्ला ही त्यांनी दिला.
अजित पवार काय म्हणाले होते?
बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलातना अजित पवार म्हणाले होते की,”आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा”, अजित पवार म्हणाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा