मुंबई | Mumbai
राज्यातल्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर ठेपल्या आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सध्या राज्यातील विविध भागात दौरे करत असून मतदार संघाचा आढावा घेत आहे. अशातच अजित पवार गटाला किती जागा मिळणार असा प्रश्न पक्षातील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण भाजपने १५० जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा सांगितला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, “आमचे कारभारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल असून ते जागावाटपाबाबत सगळे पाहत आहेत. सध्यातरी मी कुठल्याही चर्चेत जास्त लक्ष घालत नाही. विधानसभेसाठी किती जागा मागितल्या हे त्यांनी मला सांगितले नाही. पण ८० ते ९० जागा मागितल्या असे माझ्या कानावर आले आहे. त्याच्यावर किती निकाल येतो, याची कल्पना नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला माहिती नाही. महायुती सरकाराने जे कार्यक्रम सुरु केले. आश्वासन नाही, घोषणा नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना सोलर पंप विज आणि वीज माफ असेल. विद्यार्थ्यांना स्टाईपेन, मुलींना मोफत शिक्षणाचे असेल या योजना सुरु झाल्या. आम्ही आश्वासने दिली नाही. पेन्शन योजनेमध्ये सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन-तीन पर्याय शोधण्यात आले आहेत. पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय त्यांना स्वीकारण्याची मुभा देण्यात आली, असे छगन भुजबळ म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा