नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) पर्यटनाला (Tourism) मोठा वाव आहे. भाविक दोन-चार दिवस थांबले तर हॉटेल्स, हॉस्पिटल यामधून रोजगारनिर्मिती होईल. नाशकात नामवंत हॉटेल्स आहेत. नामवंत रुग्णालय (Hospital) आहेत. त्यासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने धार्मिक पर्यटनस्थळेही आहेत. त्यामुळे शहरात येणारा माणूस दोन-तीन दिवस नाशकात थांबला पाहिजे यादृष्टीने पर्यटनाचे नियोजन करावे लागेल. आयटी हब उभे राहायला वेळ लागेल; तोपर्यंत पर्यटनाला चालना द्यायला हवी, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल (शनिवार) दैनिक ‘देशदूत’ कार्यालयाला (Deshdoot Office) सदिच्छा भेट दिली. यावेळी सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे आणि इतर सहका-यांशी संवाद साधत नाशिक च्या सर्वांगीण विकासाचा धावता आढावा त्यांनी घेतला. यावेळी गोदावरी प्रदूषणावर बोलताना भुजबळ म्हणाले की, “गोदावरीतील पाणी मृतप्राय झाले आहे, असे अहवाल सांगतात. एसटीपी केवळ नावालाच चालवले जातात, पैसे चालू असतात, पण यंत्रणा बंद! यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर शुद्ध गोदाजलाची हमी हवी. त्यामुळे एसटीपीला कठोर शिस्त लावली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
निओ मेट्रो (Neo Metro) शहरासाठी फारशी उपयुक्त नाही. ती भगूर, सित्रर, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरीपर्यंत जोडल्यास उपयोग होईल, असे स्पष्ट करत त्यांनी शहरातील उड्डाणपुलांच्या अनियोजित उभारणीवरही नाराजी व्यक्त केली, शहराचे सौंदर्य खराब करू नये, आहे त्याला सक्षम करून सुयोग्य वापर करावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले. शहराचा बाढता विस्तार पाहता गंगापूर धरण समूहावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. २०४० पर्यंतची वाढती गरज लक्षात घेता किकवी पेयजल प्रकल्प हाच पर्याय आहे. सरकारनेही याला मान्यता दिली असून, प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या (Smart City) विकासात नाशिकच्या आल्हाददायक हवामानाला धक्का लागू नये याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी गंगापूर बोटक्लब, गोवर्धन कलाग्राम, अॅडव्हेंबर स्पोर्टस् सेंटर, रिसॉर्ट सारख्या प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनासह त्यांच्या उद्दिष्टाचा आढावा भुजबळ यांनी सादर केला. मांजरपाडाचे पाणी वाहून गुजरातकडे जाते, मात्र ते पाणी वळवून मराठवाड्याच्या दिशेने नेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. त्यासाठी डोंगरात मोठा बोगदा करून पाणी वळवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
… ते पाप बघवत नाही
गेल्या अनेक वर्षांपासून आपण एक मोठे पाप करत आहोत. लाखो नागरिकांचे मलजल गटारीतून थेट गोदावरी नदीपात्रात सोडतो. ते घाणेरडे पाप आहे. आपण श्रद्धेशी खेळत आहोत. हे पाप बघवत नाही! अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाच्या गोदावरी (Godavari) प्रदूषणाबाबतच्या गाफिलपणावर कठोर शब्दांत टीका केली.




