जळगाव | Jalgaon
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची (Jalgaon District Bank Election) रणधुमाळी सुरू असताना, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामनेर मतदारसंघातून महाजन यांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज सहनिबंधकांनी फेटाळल्यामुळे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
गिरीश महाजन यांचा बिनविरोध मार्ग सुकर
जामनेर तालुका (Jamner Taluka) विकास सोसायटी मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात रघुनाथ सखाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला होता. या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितली होती; मात्र सहनिबंधकांनीही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. आता पाटील यांच्यासमोर न्यायालयात जाण्याचा पर्याय असला, तरी सध्याच्या निर्णयामुळे गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता बळावली आहे.
तीन जागा बिनविरोध, २९ तारखेला मतदान
जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी (Seats) येत्या २९ तारखेला मतदान होणार असून, त्यापूर्वीच ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. ९० टक्के जागांवर एकमत झाल्याचा दावा मंत्री महाजन करत असले, तरी काही महत्त्वाच्या मतदारसंघांमधील तिढा अद्याप कायम आहे.
तीन मतदारसंघांत महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकेल असा दावा केला जात असला, तरी तीन प्रमुख मतदारसंघांत मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्षामुळे निवडणूक रंगतदार ठरत आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक (विनोद तराळ आणि देवयानी देशमुख) आमने-सामने आहेत. दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कोणीही माघार घेण्यास तयार नाही.
पाचोरा-भडगावातून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील रिंगणात आहेत असून, त्यांच्याविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे यांनी अर्ज भरला आहे. स्थानिकांमधील राजकीय संघर्षामुळे येथेही चुरस निर्माण झाली आहे. याशिवाय चोपडा येथे भाजपचे रोहित निकम आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे घनश्याम अग्रवाल आमने-सामने आहेत. दरम्यान हा तिढा लवकरात लवकर सोडवला जाईल, असे मंत्री गिरीश महाजन सांगत असले तरी, सध्याची परिस्थिती पाहता या जागांवर महायुतीमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




