अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भाजप पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सतावत आहे आणि इकडे अहिल्यानगरमध्ये त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करत आहे. हा प्रकार म्हणजे साप आणि मुंगूस एकत्र आले आहेत. जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सर्वनाश होईल, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
महापालिका निवडणुकी निमित्त ते नगर दौर्यावर होते. ते म्हणाले, भाजपने काँग्रेसबरोबर युती केली, काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये घेतले. काँग्रेस संपवण्याची भाषा करणार्या भाजपमध्येच आता काँग्रेस वाढत आहे, अशीही टीका त्यांनी केली. भगवा झेंडा घेणार्या भाजपने एमआयएमशीही युती करून बापरे म्हणायला लावले. अहिल्यानगरमध्ये मित्रानेच आमचे लव मॅरेज तोडले, त्यामुळेच आम्ही नगरमध्ये स्वबळावर लढत आहोत, आम्ही उठाव केला नसता तर भाजप कोठेच दिसली नसती, अहिल्यानगरमध्ये त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत झुलवत ठेवले आणि नंतर सोडून दिले अशीही टीका त्यांनी केली.
आमच्या उमेदवारांना धमकावले जात आहे. परंतु दादागिरीची भाषा कोणी करू नये, गुन्हे दाखल होणे शिवसेना पदाधिकार्यांना नवे नाही. गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमदार होता येत नाही. आम्ही बॅचलर ऑफ जेल आहोत. जेवढे शिवसेनेला दाबाल, तेवढे आम्ही उसळी मारून वर येऊ, असा इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.




