मुंबई | Mumbai
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर एका प्रकरणात त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधक करत आहेत, तर शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत. दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चांगलेच राजकारण तापले आहे.
अशातच आता मंत्री कोकाटे त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला. जास्त मस्ती कराल तर घरी जाल. आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवत असल्यामुळे आमच्या हातात काही राहिलं नाही”, असं म्हटले आहे. कोकाटे यांनी या विधानामुळे आपल्या राजकीय संकटात भर पडून घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले की, “आम्हाला मुख्यमंत्र्यांनी (CM) पहिल्याच दिवशी दम दिला. आता माझ्यासह तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झाले पाहिजे. आम्हाला १०० दिवसांचा कार्यक्रम देखील दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात, हे देखील मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमच्याही हातात काही राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावंच लागेल आणि तुम्हीही नीट काम करा, म्हणजे सरकारबरोबर आणि आपली चांगली सांगड बसली पाहिजे तर समाजात एकप्रकारचं स्थैर्य निर्माण होईल”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे हे आज (दि.२४) रोजी सत्र न्यायालयात (Court) धाव घेणार आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.