नाशिक | Nashik
महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी वेळोवेळी माध्यमांद्वारे आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे. आमदार भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिपद मिळाले आहे. यात कोकाटे यांना मंत्रिपद मिळाल्याने ते चांगलेच जोमात आहेत. त्यामुळे कोकाटे हे भुजबळांवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत.
काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलतांना पक्षाने छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले असून आणखी किती लाड करायचे? असे म्हणत टोला लगावला होता. तसेच माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, बाकी कोणी नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर कोकाटे यांच्या टीकेला आमदार छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देतांना,”माणिकराव कोकाटे यांना मला सांगायचं आहे की मी शरद पवारांसह (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. कोकाटे हे उपरे असून ते पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीत नव्हते.तुम्ही काल आला आहात, मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? पक्ष आणि मी बघून घेईल,” असे म्हटले होते. यानंतर आज मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, “छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना माहिती आहे की, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण कलगीतुरा नको. पक्षाकडून मला आदेश आले आहे की, भाष्य करू नये, त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे”, असे कोकाटे यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर आमदार छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
ठाकरे गटाला कोकाटेंचा टोला
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलतांना “आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले होते. यावरून कोकाटे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.ते म्हणले की, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावे? कुणासोबत लढावे? उघडे लढावे की कपडे घालून लढावे,तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी निशाणा साधला.