नाशिक | Nashik
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार घरे लाटण्याच्या प्रकरणात २० फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी (MLA) रद्द होण्याच्या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे.
यावेळी शिक्षेला स्थगिती देतांना नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) ‘माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक (Election) पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल’, असे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने नोंदवलेल्या या निरीक्षणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. याबाबत मंत्री कोकाटे यांना नाशिकमध्ये प्रश्न विचारला असता ते माध्यम प्रतिनिधींवरच भडकल्याचे दिसून आले.
मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या (Court) निकालावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे हा मुर्खपणा आहे. निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे. विरोधक, मीडियाकडून तेच तेच सुरू आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मुर्खपणा असून, हे एक राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरु असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.
पुढे कोकाटे यांनी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा देखील बोलून दाखवली. ते म्हणाले की, “कोणत्या पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना वाटणार नाही, आमच्या सर्वांची अपेक्षा आहे दादांनी या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो, राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आमची मनापासून धारणा आहे”, असे कोकाटेंनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मी नाशिक शहरात (Nashik City) संपर्क कार्यालय सुरू केले आहे. याठिकाणचे प्रश्न राज्य पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करणार असून येथे आमचा कर्मचारी वर्ग असेल. मी देखील आठवड्यातून दोन दिवस या ठिकाणी उपलब्ध असेल, असेही मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. तसेच गेल्या पाच वर्षांत देशभरात ६.४२ लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन (Land) कमी झाली असून, यातील ३.२५ लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रातूनच (Maharashtra) नाहीशी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.