Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकManikrao Kokate : "त्यांनी देशाचा पंतप्रधान, आम्ही पाच टर्म थांबलो…; भुजबळांना नाराजीवरून...

Manikrao Kokate : “त्यांनी देशाचा पंतप्रधान, आम्ही पाच टर्म थांबलो…; भुजबळांना नाराजीवरून मंत्री कोकाटेंनी सुनावले

नाशिक | Nashik

देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गुरुवार (दि.०५ ) डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर रविवार (दि.१५) डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील राष्ट्रवादीकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आले. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले आहेत.

- Advertisement -

भुजबळ यांच्याऐवजी नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली. यानंतर झालेल्या खातेवाटपात झिरवाळ यांच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची आणि कोकाटे यांच्यावर कृषीमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मंत्रिपदावरून डावलण्यात आल्याने भुजबळ यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत थेट पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांना टोला लगावला आहे.

यावेळी बोलतांना माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, “छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे मात्र, त्यांनी दम काढला पाहिजे. सरकार (Government) स्थापन होऊन चार दिवस झाले आहेत. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे, पंरतु,मला जे वाटतं ते जगात होईल, असे नाही. जशी मागणी असेल, नेतृत्वाला विचार करायला संधी मिळेल तसे पुढे होते. आम्ही ५ टर्म थांबलो, २० वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होतात आम्ही काही बोललो का? पक्ष वेगळा झाला तरी मंत्रिपद दिले तेव्हा आमच्यापैकी कुणी येऊन माध्यमांना नाराज आहोत असे सांगितले का? त्यामुळे बाकी कोणी नाराज होण्याचे कारण नाही. बदल होणे हा निसर्गाचा नियम आहे”, असे म्हणत त्यांनी भुजबळांना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले की, “मला वाटत नाही की छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असतील. त्यांचे काही गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते गैरसमज दूर होतील आणि लवकरात लवकर पक्षाच्या कामात ते सक्रीय होतील. प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे. काहींना संधी मागे मिळाली, काहींना संधी आता मिळाली. एकाच व्यक्तीला सारखीसारखी संधी दिली तर बाकीच्यांना कधी मिळणार? अनेक आमदार ५-६ टर्म निवडून आले आहेत त्यांना संधी नाही. त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे हा विचारही आपण केला पाहिजे. त्यामुळे भुजबळ तो विचार करतील असे मला वाटते”, असेही मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “अजितदादांचा वादा पक्का आहे, ते एखादी गोष्ट बोलले तर त्यातून मागे फिरत नाहीत. मी दादांनाच सिन्नरला उभे राहण्यास सांगितले होते. जेव्हा अजितदादांना गरज पडेल तेव्हा मी सिन्नरची जागा रिक्त करून द्यायलाही तयार आहे, असे म्हटले होते. मात्र ते बारामतीमधून उभे राहिले आणि निवडून आले”, असे कोकाटे यांनी म्हटले. तसेच
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे. जिल्ह्यात आमचे सर्वाधिक सात आमदार आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

कोकाटेंच्या स्वागताच्या बॅनरवर भुजबळांऐवजी आमदार सुहास कांदेंचा फोटो

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सिन्नरमधील निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या बॅनरवर भुजबळ यांचा फोटो लावण्यात आलेला नसून त्यांच्याऐवजी त्यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देतांना कोकाटे म्हणाले, “ते बॅनर मी लावले नसून कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. या कार्यकर्त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाहीत. माझ्या मतदारसंघात अनेक कार्यक्रमात भुजबळांचे फोटो मी लावलेले आहेत. त्यामुळे सिन्नरमध्ये जे बॅनर लागलेत त्यात भुजबळांचा फोटो नसेल तर तो माझा दोष नाही, कार्यकर्त्याचा आहे” असे त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...