संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात गणपतीच्या आरतीवर बंदी घालण्याच्या निर्णयातून काँग्रेस पक्षाची संस्कृती समोर आली असून, आरत्या करत फिरणार्या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा केला पाहिजे, अन्यथा गणपती सुध्दा तुम्हाला माफ करणार नाही, अशी खोचक टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. संगमनेरचे कुलदैवत समनापूर येथील महागणपतीची आरती करून मंत्री विखे पाटील यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यानिमिताने शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेमुळे शहरात ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी मंत्री विखे पाटील यांच्याशी संवाद साधून सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.
माध्यमाशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, काँग्रेसने देशाच्या संस्कृती, परंपरेला केव्हाच बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांचे नेतेच परदेशात जाऊन वाचाळपणा करीत असून, आरक्षणाच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य असो की आता कर्नाटक राज्यात गणपतीची आरती करण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसचे खरे स्वरुप लोकांसमोर आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचे ठामपणे सांगून खोटा नरेटिव्ह पसरवून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते काही स्वप्न पाहत असतील तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेत्यांनी कितीही राज्यात तळ ठोकू द्या राज्यातील जनता सूज्ञ आहे. जनता यांना पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट करून राज्यात कोणतेही नकारात्मक वातावरण नाही. महायुती सरकारने योजनांवर अतिशय चांगले काम सुरू केले असल्याने जनता महायुती सरकारच्या पाठिशीच उभी राहील, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय अतिशय क्रांतिकारी असून, निर्यात शुल्क माफ झाल्याने शेतकर्यांना जादा भाव मिळेल, त्यांची उत्पादकता वाढेल याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सर्वच शेती उत्पादित मालाचे हमीभाव वाढवले आहेत. त्याची तरतूद अर्थसंकल्पात केल्याने शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबध्द आहे. पण उठसूठ सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर टीका करणारे शरद पवार दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते त्यांनी किती उत्पादनांना हमी भाव दिला? असा प्रश्न करून शेतकर्यांच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करण्याचा धंदा केला असल्याची टीकाही मंत्री विखे पाटील यांनी केली.
हैद्राबाद गॅझेटच्या प्रश्नावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, आरक्षणाच्या संदर्भात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने टीम पाठवली होती. त्यानंतरच महायुती सरकारने दाखले देण्याचे मोठे काम केले. सरकारने शेतकर्यांच्या जमिनींबाबतचा निर्णय केला आहे. आरक्षणाच्या बाबतीत सर्व बाजू तपासल्या जात आहेत. यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे विखे पाटील यांनी या प्रश्नावरील उत्तरात सांगितले.