कोल्हार |वार्ताहर| Kolhar
विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या विरोधात खोटा अपप्रचार झाला. अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले. याच भगवतीमाता मंदिरासमोरच्या सभेत विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार केला होता. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची पध्दत. जे लोक भगवतीमातेसमोर खोटं बोलले त्यांच्यावर कोप झाला. आता ते मुख्यमंत्री तर सोडाच, कधी आमदार पण होणार नाही अशी व्यवस्था जनतेने करून ठेवली असल्याचा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावत आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत. ज्यांनी स्वतःची पत राजकारण, समाजकारणामध्ये आपल्या गावात गमावली त्यांना अशा निवडणुकांमध्ये विनाकारण अवसान येत असल्याचे टीकास्त्र कोल्हारचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांच्यावर नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले.
कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्यावतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ना. विखे पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्यावेळी याच ठिकाणी आपली मोठी सभा झाली होती. आतापर्यंत या गावात एवढी मोठी ऐतिहासिक सभा कधी झाली नाही आणि भविष्यात कधी होणारही नाही याची आठवण करून देत ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी या नागरी सत्कारातून माझ्यावर भरभरून प्रेम व्यक्त केले.
यात तरुणांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या सत्काराने मी भारावून गेलो. कोणत्या शब्दांत आभार मानावे ते कळेना. जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ऊर्जा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, जिल्ह्यातील कुकडी, गोदावरी, भंडारदरा, निळवंडेचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम ना. विखे यांच्याकडून सुरू आहे. स्वागत व प्रास्ताविक अशोक आसावा यांनी केले. आभार विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे यांनी मानले. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के आणि यमन पुलाटे यांनी केले. याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, पांडुरंग खर्डे, कृषिभूषण राजेंद्र कुंकूलोळ, चंद्रभान खर्डे, अर्जुन महाराज तनपुरे हे उपस्थित होते. नागरी सत्कारानंतर प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.