मुंबई | Mumbai
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. संजय शिरसाट यांनी हा व्हिडिओ त्यांच्या बेडरुममधील असल्याचे मान्य केले आहे, मात्र बॅग पैशांनी भरलेली नव्हती तर त्यामध्ये कपडे होते, असा दावा त्यांनी केला आहे. व्हिडिओ कोणी काढला याबद्दल माहिती नसल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज (दि.11) खळबळजनक आरोप केले होते. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप राऊतांनी केला होता. संजय राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे. कारण संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, त्यात मी बसलो आहे. बेडरुममध्ये बनियानवर बसलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, मी प्रवासातून आलोय. कपडे काढले. त्यानंतर बेडवर बसलो आहे. एवढे पैसे असेल, तर अलमाऱ्या मेल्या आहेत का? नोटा कपाटात ठेवल्या असत्या. कपड्याची बॅग देखील पैशांची दिसत आहे. खरंतर यांना कपडे ठेवण्यासाठी बॅग लागत नाहीत. तर पैसे ठेवण्यासाठी बॅग लागते. असे त्यांचे वर्तन आहे’.
संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचा काम केले. शिंदे साहेब दिल्लीला अमित शाह साहेबाला भेटले व त्यांनी सांगितले की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळे पाहिले, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. मुर्खासारखे स्टेटमेंट दिसतात. सकाळी उठले का एकनाथ शिंदे, दुपारी उठले का एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढचे संजय राऊत यांचे चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना संजय शिरसाटांविषयी मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाई होईल. एक संबंधित मंत्री आहे, त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला. त्या व्हिडिओमध्ये मंत्री महोदय पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. या बॅगेत नोटांचे बंडल आहेत. योग्य वेळ येताच सर्व पुरावे गोळा होत असतात. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत असते’.
शिंदे गटावर टीका करताना राऊत पुढे म्हणाले, ‘शिंदेंच्या जवळच्या लोकांवर कारवाई होईल, असा दावा राऊतांनी केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती खास पुरावा लागलाय. दिल्लीतील शिंदे यांच्या पाठिशी असणाऱ्या शक्ती कमकुवत होत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. सत्तेचे संरक्षण हे तात्पुरते असते. दिल्लीतील संरक्षक कमकुवत झाल्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्याकडे असणाऱ्या फाईल उघडतात,असेही राऊतांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




