संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner
राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. स्थानिक पातळीवर
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मतं मिळतील, काँग्रेसचीच हवा राहील, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
ना. थोरात हे काल संगमनेरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तीन पक्षांच्या सरकारमध्ये समन्वय नाही, असा वारंवार आरोप करणारे चंद्रकांत दादा पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील यांना आता काम काय राहिलं आहे? विरोधी पक्षाचे आहेत ते.
त्यांचं बोलणं फार गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. विरोधकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडी आपलं काम करीतच राहील, असे सांगितले. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या स्थानिक पातळीवरील निवडणुकीमध्ये काँग्रेसची काय भूमिका राहील? या प्रश्नावर ना. थोरात म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरील असल्याने प्रत्येकाला पक्ष वाढविणे ही जबाबदारी असते. तसाच आमचाही प्रयत्न राहिल. मात्र सर्वात जास्त काँग्रेस पक्षाला मतं मिळतील, हवा काँग्रेसचीच राहिल. असेही ते म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन करतांना सामान्य माणूस केंद्र बिंदू ठेवण्यात आला होता. गरीब आणि मागासवर्गीयांचा जीवनस्तर उंचावा यावरच आम्ही लक्ष्य केंद्रीत केले होते. या विषयावर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सतत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधीत असतात. अशा प्रकराच्या संवादात कधीकधी पत्ररुपी चर्चाही करावी लागते, तो देखील संवादाचाच भाग असल्याने त्यात वेगळे काही नाही.
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्याच्या विषयावर प्रकाश टाकतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या सूत्रावर निर्माण झाली आहे. ते सूत्र अधिक सक्षमपणे कसे राबवता येईल यावरच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्या पत्रातून चर्चा केली असून नाराजी वगैरे असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.
अनेकांची घरवापसी होणार..
काँग्रेस व राष्ट्रवादी सोडून अनेकजण भाजपात गेले होते. मात्र आता त्या सर्वांची पुन्हा स्वपक्षात येण्याची इच्छा असून अनेकांशी आमची चर्चाही सुरू असून लवकरच अनेकांची घरवापसी होण्याचे संकेतही ना. थोरात यांनी यावेळी दिले.