राहाता |प्रतिनिधी| Rahata
आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देवून झालेला सन्मान खूप मोठा असून, झालेला सन्मान राज्यातील शेतकर्यांना समर्पित करीत असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देवून राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कृषी मंत्री आणि प्रकुलपती माणिकराव कोकाटे, मंत्री मेघना बोर्डीकर, डॉ. व्ही. के. तिवारी, कुलगुरू डॉ. इंद्र मणी, केंद्रीय मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, मराठवाडा कृषी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेले संशोधन महत्वपूर्ण आहेच. पण भविष्याची गरज लक्षात घेवून आपल्या संशोधनाची दिशा आता बदलावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी विद्यापीठांना काम करावे लागणार असल्याचे सांगून विषमुक्त शेती निर्माण करण्याचे आव्हान आपल्या सर्वांना स्विकारावे लागणार आहे. बांबू शेतीच्या संदर्भात पाशा पटेल यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख करून ना. विखे पाटील म्हणाले, येणार्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकराचे आहे. यासाठी कराव्या लागणार्या कामाकरिता आजचा सन्मान पाठबळ देणारा ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
परभणी येथील कृषी विद्यापीठात झालेल्या या सोहळ्यास पद्मश्री डॉ. विखे कारखाना तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. ना. विखे पाटील यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, आ. काशिनाथ दाते, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा. चेअरमन सतीश ससाणे, प्रवरा बँकेचे चेअरमन भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, भाजपाचे कार्याध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.