अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी प्रश्नावरून नेहमीच अन्याय झाला आहे. बाहेरच्या नेत्यांकडे येथील काही नेत्यांनी जिल्हा आंदण दिला होता, त्यामुळे कुकडी, निळवंडे आणि साकळाई यासारखे प्रकल्प रखडले. मात्र, आता जलसंपदा खाते माझ्याकडे आल्याने हे प्रश्न मार्गी लागत आहेत. जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करण्यासाठी विस्तारीत एमआयडीसी उभारणार असून एमआयडीसीतील खंडणीबहादरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
महायुती पदाधिकार्यांतर्फे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री विखे पाटील आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ रविवारी नगरच्या सहकार सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना ना. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी मोठा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ना. विखे पाटील म्हणाले, शिर्डी, बेलवंडी आणि नागापूर येथे विस्तारीत एमआयडीसी उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होईल. यामुळे सुमारे 10 हजार तरुणांना रोजगार मिळेल. मात्र, सध्या एमआयडीसीमध्ये काही खंडणीबहाद्दर टोळ्या उद्योजकांना त्रास देत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरच कठोर पावले उचलली जातील.तसेच, जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.
याआधी बाहेरच्या नेत्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यावर अन्याय केला. पाणीप्रश्न हा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असून, निळवंडे, कुकडी आणि साकळाई प्रकल्प रखडण्यास येथील काही नेत्यांचे सहकार्य होते. मात्र, आता जलसंपदा खाते माझ्याकडे आल्याने हे प्रश्न मार्गी लागत आहेत. साकळाई योजनेसंदर्भात टीका करणार्यांनाही उत्तर दिले जाईल. तसेच, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्यात वळविण्यासाठी सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करून पाणीप्रश्नी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाद मिटविला जाईल,असे ना. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. या समारंभाला सभापती शिंदे, पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आ. शिवाजी कर्डिले, माजी खा. डॉ. सुजय विखे, तसेच नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप, काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकर्यांसाठी कर्जवाढीचा प्रस्ताव
जिल्हा बँकेकडून शेतकर्यांना दिल्या जाणार्या पीक कर्जामध्ये वाढ करण्याची मागणी ना. विखे यांनी यावेळी केली. सध्या एकरी 30 हजार रुपये पीक कर्ज दिले जाते, ते 40 हजार रूपये करावे. तसेच, पशुपालकांसाठी दीड लाखांचे कर्ज वाढवून दोन लाख करावे, अशी मागणी चेअरमन आ. कर्डिले यांच्याकडे केली. त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन दिले.
डॉ. विखे राज्यसभेवर, तर कर्डिले मंत्री
या कार्यक्रमात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्टेजवर सर्वजण आमदार असताना आपणच माजी असल्याची भावना व्यक्त केली. त्यावर सभापती शिंदे यांनी, माझ्या विधान परिषदेवर निवड होण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा भाजपने ठराव केला होता. तुम्हीही श्रध्दा व सबुरी ठेवा, लवकरच तुमचे पुनर्वसन होईल, असा सल्ला दिला. सभापती शिंदे म्हणाले, डॉ. विखे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी सर्व आमदार प्रयत्न करतील. तसेच, आ. कर्डिले यांनी अनेकदा कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठीही पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील,असे सांगितले.