नाशिक । फारुक पठाण Nashik
15 ऑगस्टला राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजवंदन करण्यासाठी विविध मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. त्यावरून कुजबूज सुरू असतानाच आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे आमदारांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकला आणखी एक मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठीसुद्धा रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पाठिंबा देऊन सरकारामध्ये स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्र्यांना खाते वाटप झाले असले तरी त्यांना अद्यापही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळालेले नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपकडून गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र सध्या शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना बदलणे शक्य वाटत नसले तरी दबक्या आवाजात मात्र पालकमंत्री बदलाच्या चर्चा जोरदारपणे सुरू आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
राज्य मंत्रिमंडळात काही मंत्रीपदे रिकामी आहेत. सरकारमधील मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची संख्या पाहता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाशिकला आणखी एक मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात भाजपच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, पश्चिमच्या आमदार सीमा हिरे तसेच चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची नावे अग्रभागी आहेत.
2017 मध्ये झालेल्या नाशिक मनपा निवडणुकीत त्या वेळेचे मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती.त्यानुसार नाशिक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे तब्बल 66 नगरसेवक महापालिकेत निवडून आले होते. सहा वर्षे एक हाती सत्ता होती. त्या पंचवार्षिक काळात भाजपने शहराच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प नाशिकला आणले. मात्र 2019 मध्ये भाजपची सत्ता गेल्याने त्याला ब्रेक लागला. त्यानंतर महापालिकेत प्रशासक राजवट आल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. मात्र त्या विकासकामांना गती देण्यासाठी तसेच भाजप कोट्यातून मंत्रीपद मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
विकासकामे मार्गी लागणार?
मुंबई-पुणे-नाशिक असा सुवर्णत्रिकोण तयार झाला आहे. त्यात नाशिक शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. 2017 पासून नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती. या काळात केंद्र सरकारच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विकासकामांचे भूमिपूजन झाले. मात्र ती हजारो कोटी रुपयांची कामे रखडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालकमंत्री किंवा आणखी एक मंत्रिपद भाजपच्या कोट्यातून नाशिकला मिळाले तर रखडलेली कामे मार्गी लावता येतील आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाला ऊर्जा देता येईल, असे बोलले जात आहे.