पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
अल्पवयीन मुलीसोबत पळून गेलेल्या युवकासह संबंधित मुलीला पाथर्डी पोलिसांनी हुशारीने सापळा रचून ताब्यात घेतले. ‘लग्न लावून देतो’ असे सांगत मुलीकडील नातेवाईकांनी दोघांचा विश्वास संपादन केला आणि पोलिसांच्या मदतीने लग्नस्थळीच त्यांना ताब्यात घेतले.
दि. 9 एप्रिलला सकाळी 10 वाजेच्या सुमारास संकेत राम गोंडकर (रा. केरुळ, ता. आष्टी, जि. बीड) याने पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील एका गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून फसवून पळवून नेले होते. या घटनेबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी युवक व मुलीला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात पोलीस अल्पवयीन मुलीचा जबाब घेऊन पुढील गुन्हा दाखल करणार आहे. ‘तुमचे लग्न लावून देतो’ असे सांगत दोघांना 29 एप्रिलला मुलीच्या नातेवाईकांनी पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव शिवारातील दत्त मंदिरात बोलावले. त्या ठिकाणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच सापळा लावून सज्ज होते.
नवरा-नवरीच्या पेहरावात दत्त मंदिरात आलेल्या दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. नवरदेव लग्नाचा टोप, मुंडावळ्या आणि लग्नाचा पोशाख परिधान करून आला होता, तर नवरी लाल साडी व पारंपरिक मुंडावळ्या घालून सजली होती. मात्र, लग्नाऐवजी थेट पोलीस स्टेशनचा रस्ता त्यांना दाखवण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरिश भोये, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, हवालदार विजय भिंगारदिवे, ईश्वर बेरड, पोपट आव्हाड, अक्षय वडते, दुर्योधन म्हस्के, उत्कर्षा वडते तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.