संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
लोकांच्या शेतात मक्याची कुट्टी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबत जाणार्या पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला एका विवाहित तरुणाने मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर तीन-चार वेळा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली असून 21 जून 2024 ला तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय 36, रा. तळेगाव दिघे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पीडित अल्पवयीन मुलगी ग्रामीण भागातील रहिवासी असून शालेय शिक्षण घेत आहे. 2023 नोव्हेंबर महिन्यात ती तिच्या आई-वडिलांसोबत लोकांच्या शेतात मक्याची कुट्टी करण्यासाठी गेली होती. मका कापणे ती जमा करणे आदी कामे ती करायची. बोडखे याची पत्नी सुद्धा कामाला यायची. त्यांचे भांडण झाले की, ती दोन-चार दिवस ती माहेरी निघून जायची, त्यावेळी बोडखे हा अल्पवयीन मुलीजवळ जायचा, तिला घरी चल म्हणायचा, घरी आल्यावर तुला गिफ्ट देतो असे तो म्हणायचा. परंतु मुलगी त्याला नकार द्यायची.
दरम्यान, एकेदिवशी मुलीचे आईवडील सोबल आलेले नव्हते, त्यावेळी रात्री 11 वाजता काम झाल्यानंतर बोडखे हा तिला त्याच्या घरी चल म्हणाला. मुलगी त्याच्यावर ओरडली. घरी सोबत न आल्यास त्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली. मुलगी घाबरून त्याच्या घरी गेली. तेव्हा त्याची बायको माहेरी गेलेली होती. त्याने मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले, कुणाला काही सांगितल्यास आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. धमकी देऊन त्याने तीन-चार वेळा मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर 21 जुलै 2024 रोजी मुलीला उलटी होऊन चक्कर येत होती. तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुसर्या दिवशी पहाटे मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला सरकारी रुग्णालयात आणि तेथून एका दुसर्या रुग्णालयात नेले असता पीडित मुलीची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरुन तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते हे करत आहे. यातील आरोपी बोडखे याला पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर उभे केले असता 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.