अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका 24 वर्षीय संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी हमीद शौकत सय्यद (वय 24, रा. लोंढे मळा, कल्याण रोड, गर) याने फिर्यादी यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन नातीशी तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेश कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, सुवर्णा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे व अर्जुन बडे यांचा समावेश होता.21 फेब्रुवारी 2026 रोजी पथकास बातमीदारामार्फत आरोपी हा आण्णाभाऊ साठे चौक, लालटाकी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचला.
लाल टाकी परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव हमीद शौकत सय्यद (वय 24) असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताब्यातील आरोपीस पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.





