वणी / ओझे | वार्ताहर Vani,Oze
अल्पवयीन मुलीवर कारमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा आरोप असणारा संशयित दानीश रईस शेख याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दानीश रईस शेख रा. संस्कृतीनगर या संशयीताने वणीतील एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढुन वणीलगत असलेल्या फोपशी रस्त्यावर निर्जन स्थळी कारमधे शारीरीक अत्याचार केला होता.व याबाबत कोणाला काही सांगीतले तर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घरी काही सांगितले नाही मात्र संशयीत दानीश शेख याने मुलीच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधत मुलीला फोन करायला लावल्यानंतर आईने याबाबत चौकशी केली असता पिडीत मुलीने सर्व माहिती आईला सांगितली.
दरम्यान सदरचे कुटुंबिय भीतीपोटी वणी येथुन नाशिकला स्थलांतरीत झाले, मात्र तरीही दानीशचा त्रास सुरुच राहीला. त्यानंतर हिमतीने म्हसरुळ पोलिस ठाण्यात याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन दानीशवर गुन्हा दाखल करण्यात आला व वणी पोलिसांकडे तो हस्तांतरीत करण्यात आला. मात्र दानीशला फरार करण्यात आल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले.
अखेर फरार दानीशला शोधण्यासाठी वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयूक्त शोधमोेहीम राबविली. अभोणा, नाशिक, जालना, मनमाड, संभाजीनगर येथे शोधा घेतला. त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. अखेर नगर येथुन अजमेर येथे दानीश जात असल्याची माहिती पोलिसांंना मिळाली. कोपरगाव येथे बस बदलत असताना दानीशला पोलिस पथकाने जेरबंद केले.
तांत्रिक विश्लेषण, वरीष्ठांचे मार्गदर्शन व कुटुंबियाकडुन प्राप्त माहिती व सखोल चौकशी करुन मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन पकडुन आणलेल्या दानीशला वणी पोलिस ठाण्यात आणुन बुधवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान नाशिक येथील जिल्हा न्यायालयात संशयीत दानीश याला उभे केले असता युक्तीवाद ऐकुन पाच दिवसांची पोलिस कोठडी दानीशला देण्यात आली. या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेली कार त्यावेळी कार उपलब्ध करुन देणारा दानीश शहा व दानीश शेख याने भेटायला बोलावल्याचा निरोप देणारी पिडीतेची मैत्रीण यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती यंंत्रणेने दिली.




