अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरालगतच्या एका गावात अल्पवयीन मुलीवर (वय 13) वारंवार अत्याचार करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रविवारी (2 ऑगस्ट) दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूद्र नायडु, जॉय शिंदे (दोघे रा. कोंबडीवाला मळा, सोलापूर रोड, दरेवाडी, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत ही घटना घडली आहे. संशयित आरोपींनी पीडिता अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असूनही दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिला दमदाटी केली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या वेळी त्यांच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याचबरोबर, घडलेल्या प्रकाराची कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकीही संशयित आरोपींनी पीडितेला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार लक्ष्यात आला. यानंतर पीडितेच्या आईने भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार दोघांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.




